आकेरीतील दुचाकी अपघातात पिंगुळीतील युवक ठार
कुडाळ -
आकेरी मेट येथील वळणादरम्यान ( कोकाकोला जुने गोदाम समोर) होंडा लिवा मोटरसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार किशन केशव पिंगुळकर ( 22, पिंगुळी - आंबेडकरनगर ) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा आते भाऊ श्रीराम पांडुरंग केळूसकर ( 2 1 , पिंगुळी - आंबेडकरनगर) मोटारसायकलच्या मागे बसला होता. त्याला किरकोळ दुखापत झाली. श्रीराम याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह चौघेजण मोटारसायकलने कोलगाव - सावंतवाडी येथे चायनीज खाण्यासाठी गेले होते.तेथून ते आपल्या घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.किशन याने पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन अभ्यासक्रमाची पदवी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केली आहे. या घटनेने पिंगुळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. किशन याच्यावर रविवारी दुपारी पिंगुळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. किशन पिंगुळकर हा राहत असलेल्या पिंगुळी- आंबेडकरनगर येथे त्याचा आतेभाऊ श्रीराम केळुसकर याचे घर आहे. श्रीराम याचा शनिवारी वाढदिवस असल्याने किशन, श्रीराम यांच्यासह अन्य दोघे दोन मोटरसायकल घेऊन पिंगुळी येथून कोलगाव - सावंतवाडी येथे चायनीज खाण्यासाठी गेले होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कोलगाव - सावंतवाडी येथून ते चौघे मोटारसायकलने पुन्हा पिंगुळी येथे येण्यासाठी निघाले. किशन चालवित असलेल्या मोटरसायकलच्या मागे श्रीराम बसला होता. आकेरी मेटच्या उतारावरून त्याची मोटारसायकल खाली आल्यानंतर पुढे असलेल्या वळणानजीक किशन याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला. यात श्रीराम हा रस्त्यावर फेकला गेला, तर किशन व मोटरसायकल काही अंतर पुढे जाऊन रस्त्यावर पडली.किशन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लागलीच कोलगाव - सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच पिंगुळी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अपघातग्रस्त होंडा लिवा मोटरसायकलच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर देवेंद्र रमेश पिंगुळकर यांनी पोलिसात दिली. पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य व रिक्षा व्यवसायिक केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचा किशन हा मुलगा होय .