पर्वरी येथील अपघातात नानोड्याच्या युवकाचा मृत्यू
पणजी : सुकूर, पर्वरी येथे महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला युवक रस्त्यावर कोसळला आणि बाजूने जाणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. दुचाकी चालविणारा किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत पर्वरी पोलिसांना माहिती मिळताच पर्वरी पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला. जखमी शुभम याच्यावर पर्वरी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव सनी अशोक नार्वेकर (28, नानोडा-डिचोली) असे आहे.
जखमी झालेल्या युवकाचे नाव शुभम म्हावळींगकर असे आहे. हा अपघात काल गुऊवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. सनी नार्वेकर आणि शुभम म्हावळिंगकर हे दोघे जीए-03-डीबी-2845 क्रमांकाच्या दुचाकीने पर्वरीहून म्हापशाकडे जात होते. सुकूर येथे पर्वरी जुना बाजार जंक्शनपासून काही अंतरावर दुचाकी पोचली असता हा अपघात झाला. पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर पडलेले डांबर तसेच काँक्रिटमुळे हा महामार्ग चिखलमय झाला होता. याच चिखलातून जाताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीवरून खाली पडलेल्या सनीच्या अंगावरून मागून येणारा अवजड ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम हा जखमी झाला आहे. पर्वरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुऊ आहे.
सनी होता कुटुंबाचा आधार
नानोडा-डिचोली येथील सनी नार्वेकर (28) याचा सुकुर - पर्वरी येथे दुचाकीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सनी आपल्या आईचा वैद्यकीय अहवाल बांबोळी इस्पितळातून घेऊन दुचाकीस्वार मित्र शुभम म्हावळींगकर याच्या पाठिमागे बसून घरी येत होता. यावेळी पावसाचे पाणी भरलेल्या खड्डेमय रस्त्यावर झालेल्या अपघातात सनीचा बळी गेला. गेल्या काही दिवसांपासून सनी नार्वेकरची आई आजारी असल्याने तिचा वैद्यकीय अहवाल बांबोळी गोमेकॉमधून घरी घेऊन येत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. काल गुऊवारी त्यांच्या घरी महालय श्राद्ध विधी होता. त्यासाठी त्याने कामावर सुट्टी घेतली होती. सनी कोलवाळ येथील क्रॉम्प्टन कंपनीत कामाला होता. तो कुटुंबाचा आधार होता. त्याच्यावरच काळाने घाला घातल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्याच्या पश्चात वडील निवृत्त कदंब कर्मचारी अशोक नार्वेकर, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
उत्तरीय तपासणी अहवालानंतर सनीचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. रात्री त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.