चिपळुणात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून! शहरातील बहाद्दूरशेख नाका परिसरातील खळबळजनक घटना
तपासाअंती तासाभराच खूनाचा उलघडा; दोघा तरुणावर खूनाचा गुन्हा, एका अल्पवयीन तरूणाचा समावेश
चिपळूण वार्ताहर
एका 38 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे रविवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली. भर चौकात झालेल्या या प्रकारानंतर मारेकऱ्याच्या शोधासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा गतिमान होताच चहूबाजूच्या तपासाअंती अवघ्या तासाभरात हत्येचा उलघडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयिताच्या चौकशीनंतर त्यांनी या खूनाची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचाही समावेश असून खूनाचे कारण पुढे आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद महमंद शेख (38, काविळतळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नीलेश आनंद जाधव (27, वडार कॉलनी, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शहरातील बहाद्दूरशेख नाका परिसरातील वांगडे मोहल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या प्रवेशव्दारावर एक सलूनचे दुकान आहे. त्या दुकानाच्या पायरीठिकाणी हमीदच्या डोक्यात दगड आणि फरशी घालून त्याचा खून करण्यात आला व त्या पायरीवर रक्ताच्या थारोळ्यात तो निपचित पडलेल्या स्थितीत होता. याशिवाय ज्या दगड व फरशीने त्याचा खून करण्यात आला, तो दगड व फरशी त्याच्या डोक्याजवळ पडलेली होती. भर चौकात हा प्रकार घडल्याने तसेच त्या रस्त्यावर सातत्याने ये-जा असल्याने रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याची माहिती चिपळूण पोलिसाना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ धाव घेतली. हा खूनाचा प्रकार पुढे आल्यानंतर त्याच क्षणी मारेकऱ्याच्या शोधासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण पोलीस यंत्रणा गतिमान झाली.
खूनाचे कारण अस्पष्ट
भर चौकात झालेल्या या खूनानंतर मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी गोपनीय माहिती व त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. यातूनच तपास यंत्रणेला काही महत्वाचे धागेदारे सापडले. त्यानुसार घटनास्थळी 2 तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे स्पष्ट होताच त्यानुसार घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या शहरातील वडार कॉलनी येथून नीलेश जाधव याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच हमीदच्या डोक्यात दगड व फरशी मारुन खूनाची कबुली दिली आणि अवघ्या तासाभरातच हमीदच्या खूनाचा उलघडा झाला. दरम्यान, कोणत्या कारणातून हा खून केला, याचे कारण पुढे आले नसून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुऊ आहे. असे असतानाच या प्रकारानंतर रत्नागिरीहून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड या देखील चिपळूण येथे दाखल झाल्या होत्या. त्यांनी या खून प्रकरणाची माहिती घेतली.
हमीद अंडरआर्म क्रिकेट खेळाडू
काही वर्षापूर्वी चिपळूण शहरात अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेची आगळीवेगळी क्रेझ होती. प्रत्येक वाडीवस्तीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जात असे. त्यामध्ये हमीदची चौफेर खेळाडू म्हणून ओळख होती. या बरोबर हमीद हा ‘कलर’ या नावानेही सर्वत्र परिचित होता. तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये ‘तौसा अंड तौसा’ या संघातून खेळत असल्याची माहिती पुढे येत आहे. अनेक वर्षापासून तो शहरातील काविळतळीसह त्या परिसरात राहत होता. शिवाय त्याला दारुचे व्यसनही होते. काही वर्षापूर्वी त्याच्या वडिलाचे निधन झाले. तर त्यांची आई कुवेत येथे गृहिणी म्हणून काम करते.
या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हर्षद हिंगे, पंकज खोपडे, विकास निकम, ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय खामकर, संतोष शिंदे, संदीप माणके, रोषण पवार, आशिष बल्लाळ, प्रितेश शिंदे, प्रमोद कदम आदींचा समोवश होता.