मुलीच्या ट्यूशन शिक्षिकेलाच तरुणाने केले ब्लॅकमेल
युट्यूबरचा दाम्पत्याला गंडा, लाखो रुपये उकळल्याचा प्रकार
बेळगाव : युट्यूब चॅनेलच्या नावे बेळगाव शहर व जिल्ह्यात फसवणुकीचे अनेक प्रकार सुरू आहेत. एखादा फोटो किंवा व्हिडिओ जवळ ठेवून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. असाच प्रकार रायबाग येथील एका युवकाच्या अंगलट आला आहे. आपल्या मुलीची ट्यूशन घेणाऱ्या शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून जिल्हा सीईएन पोलिसांनी एका तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवनायक निर्वाणी येळ्ळूर (वय 39) राहणार देवनकट्टे, ता. रायबाग, सध्या राहणार रायबाग असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवनायकला अटक केली आहे. या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार शिवनायक हा युट्यूब
चॅनेल चालवतो. त्याने पाचवीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला रायबाग येथील एका शिक्षिकेकडे ट्यूशनला पाठवले होते. सर्व पालकांचे मोबाईल क्रमांक नोंदवूनघेतल्याप्रमाणेच ट्यूशन टीचरने शिवनायकचाही मोबाईल नंबर घेतला. मुलीची शैक्षणिक प्रगती किंवा ट्यूशनला सुटी कधी असते, याविषयी माहिती दिली जात होती. त्यासाठीच शिक्षिकेने शिवनायकचा मोबाईल नंबर घेतला होता. हळूहळू त्या शिक्षिकेबरोबर युट्यूबरने चॅटिंग सुरू केले. अधूनमधून फोनवरून संभाषणही होऊ लागले. काही महिन्यांनंतर व्हिडिओ कॉल सुरू झाले. शिवनायकने शिक्षिकेशी केलेले संभाषण रेकॉर्ड करून घेतले होते. एक दिवस तिला बोलावून ‘तुमच्याशी बोललेले अनेक रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. मला पैसे दिले नाहीत तर ते व्हायरल करू’ अशी धमकी दिली. एक वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता.
शिवनायकच्या धमकीने घाबरलेल्या शिक्षिकेने आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. पती आणि शिवनायक यांच्यात चर्चा झाली. प्रकरण मिटवण्यात आले. यासाठी एकटा मध्यस्थ होता. एकूण 12 लाख रुपये द्यायचे ठरले. यापैकी 5 लाख रुपये दागिने स्वरुपात द्यायचे होते. पैसे देऊन त्याला गप्प करण्यात आले होते. एक महिन्यानंतर शिवनायकने त्या शिक्षिकेच्या दीराशी संपर्क साधून ‘तुझ्या वहिनीचे रेकॉर्डिंग आपल्याजवळ आहेत. पाच लाख रुपये दे नाहीतर ते व्हायरल करू’ अशी धमकी दिली. युट्यूबरच्या त्रासामुळे कंगाल झालेल्या शिक्षिका व तिच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची भेट घेऊन गेल्या एक ते सव्वावर्षापासून घडलेला प्रकार सांगितला. आता पुन्हा आपल्याला कशा पद्धतीने ब्लॅकमेल केले जात आहे, याविषयी माहिती दिली. जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल करण्यात आला. शेवटी पोलिसांनी शिवनायकला अटक केली असून त्याच्या एका फरारी साथीदाराचाही शोध घेण्यात येत आहे.