महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकीय निकालाचे वर्ष

06:29 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2024 या नवीन वर्षाचे स्वागत करताना आगामी नवीन वर्ष हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निकालाचे वर्ष असणार असून, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड कऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय, 2023 ला अजित पवार हे राष्ट्रवादीत स्वत:च्या काकांना आव्हान देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. या सर्व राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनतेच्या दारी जावे लागणार असून जनतेच्या न्यायालयातच या लोकांचा निकाल लागणार आहे.

Advertisement

2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग करत उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, मात्र केवळ अडीच वर्षातच उध्दव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेतील बिनिचे शिलेदार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जून 2022 ला सुरत-गुवाहाटी-गोवा मार्गे जात शिवसेना फोडली आणि शिवसेनेची दोन शकले झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै 2023 ला अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात जात राष्ट्रवादीवर दावा ठोकला. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांची चार शकले झाली.

Advertisement

गेल्या दोन वर्षापासून या चार पक्षांमध्ये पक्ष आणि चिन्हासाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांकडे दोन्ही गटांच्या आमदारांची साक्षी, उलटतपासणी पूर्ण झाल्या असून 10 जानेवारीला याबाबत निकाल दिला जाणार आहे. या निकालानंतर राजकीय संक्रांत कोणावर येणार? आणि या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीलाच लागणारा हा निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी महत्त्वाचा असणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासाठी चाललेली लढाई ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ असे सांगत थेट काकांना आव्हान देणाऱ्या अजित पवारांसाठी तसेच शरद पवार यांच्यासाठीही आगामी वर्ष हे निर्णायक असणार आहे. जे काकांनी 38 व्या वर्षी केले ते मी 60 व्या वर्षी केले असे बोलत थेट काकांच्या बंडाचा उल्लेख करत आपल्या बंडाचे समर्थन करणाऱ्या अजित पवार यांच्यासाठीही 2024 हे वर्ष राजकीयदृष्टा महत्त्वाचे असणार आहे. कारण काकांनी 38 व्या वर्षी बंड केल्यानंतर त्यांनी राज्याच्या आणि राष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अजित पवार यांचे बंड बघता अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा योग्य की अयोग्य होता हे 2024 हे वर्ष ठरवणार आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबरच या पक्षांसोबत असलेल्या आणि गेलेल्या अनेक प्रस्थापित नेत्यांची परीक्षा या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये होणार आहे. गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात दुसरी आणि तिसरी पिढी असणाऱ्या राजकीय घराण्यांना मात्र गेल्या अडीच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीची चांगलीच झळ बसलीय. त्यामुळे काहीजण काठावर आहेत तर काहीजण अजुनही खुंठा हलवून चाचपणी करत आहेत, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंडानंतर स्थानिक स्पर्धा वाढली असून कधी काळी विरोधक असणारे आता सोबत आले आहेत. काही ठिकाणी मित्रांमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्ष आणि उमेदवार उदंड झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापितांचे राजकारण संपुष्टात येईल तर अनेक नवोदितांना गुलाल लागणार आहे. त्यामुळे या वर्षाच्या पोतडीत नेमके काय दडले आहे हे येणारा काळच सांगेल. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली घरघर आणि राजकीय अस्थिरता ही किमान 2024 ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच संपेल, अशी आशा नवीन वर्षाच्या निमित्ताने करण्यास काय हरकत नाही.

राजकीय संक्रमणाला सुरूवात

मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्य प्रवेश करतो याला संक्रमण म्हणतात तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे संक्रमण होण्यास सुरूवात झाली आहे. दोनच दिवसापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बडे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघिरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करताना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. तब्बल 200 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत वाघिरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदार संघातून मोहीते पाटील घराण्याने विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना विरोध करताना या जागेवर केलेला दावा बघता माढ्याचा तिढा वाढणार का? सुटणार की धैर्यशील मोहीते पाटील संक्रमण करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तिकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तीन पक्षांच्या युती आणि आघाड्यात मात्र अनेकांना आपल्या महत्वकांक्षेला मुरड घालावी लागत असल्याने काही इच्छुकांना विधानसभेच्या निवडणुकीची बोळवण करून नाराजी दूर केली जाईल मात्र काही जण लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने येत्या काही दिवसात अनेकांचे राजकीय संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article