समुद्रगायीचा अद्भूत अवशेष
भूमीत गाडले गेलेले पुराणकालीन सांगाडे, अवषेश इत्यादी उकरुन काढून इतिहासाविषयी आणि गतकाळातील प्राणी आणि मानवी जीवनाविषयी माहिती गोळा करण्याचे एक शास्त्र विकसीत झाले आहे. अनेक पुरातत्व संशोधक या शास्त्राच्या साहाय्याने पुरातन मानवी संस्कृती किंवा त्यावेळच्या प्राण्यांविषयीचा अभ्यास करण्यात मग्न असतात. सजीवांचा वर्तमान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास समजून घेणे आवश्यक ठरते, असे संशोधक म्हणतात.
या प्रकारच्या संशोधनात कित्येकदा आश्चर्यकारक पुरावे हाती लागतात. असाच एक जीवाश्म पुरावा नुकताच संशोधकांच्या हाती लागला आहे. हा जीवाश्म एका समुद्रगायीचा असून त्याचा अभ्यास केल्यानंतर संशोधकही आवाक् झाले आहे. प्राण्यांच्या प्रजातींमध्ये अन्नासाठी कशी जीवघेणी स्पर्धा कोट्यावधी वर्षांपूर्वीही होती, याचे पुरावे या जीवाश्माच्या अभ्यासातून संशोधकांच्या हाती लागले आहेत. व्हेनेझुएला या देशातील एका गावात हा जीवाश्म संशोधकांना सापडला आहे.
या समुद्रगायीवर प्रथम एका मगरीने हल्ला केला होता आणि त्यानंतर काही क्षणातच एका शार्क माशानेही तिचा घास घेण्याचा प्रयत्न केला होता, असे या अभ्यासावरुन दिसून आले आहे. म्हणजेच ही समुद्रगाय एकाचवेळी तिच्या दोन शत्रूंच्या तावडीत सापडली होती आणि त्यांचे सावज बनली होती. ही घटना किमान 2 कोटी वर्षांपूर्वीची आहे. समुद्रगायीच्या या जीवाश्माच्या एका भागावर मगरीच्या दातांच्या खुणा आढळल्या आहेत. तर दुसऱ्या भागावर शार्क माशाच्या दातांच्या खुणा आहेत. यावरुन ती कशा प्रकारे दोन शत्रूंच्या तावडीत एकाचवेळी सापडली होती, हे स्पष्ट होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.