50 हजार बांबूंनी तयार केलेला अद्भूत पूल
रामसेतूची करून देतो आठवण
जगात विविध प्रकारचे पूल आहेत. काही पूल निसर्गाच्या मदतीने तयार झाले आहेत, तर काही पूल मानवी बुद्धीमत्तेमुळे निर्माण झाले आहेत. परंतु या पूलांनी मानवी जीवनाला सुलभता मिळवून दिली आहे. कंबोडियात रामसेतूची आठवण करून देणारा एक पूल आहे. परंतु हा पूल दगडांनी नव्हे तर बांबूंनी तयार करण्यात आला आहे. या 3,300 फूट लांबीच्या पूलाला 50 हजार बांबूंचा वापर करत पाण्यात उभे करण्यात आले आहे. हा पूल पाहताना अत्यंत अद्भूत वाटतो.
दरवर्षी होते निर्मिती
पावसाळय़ापूर्वी स्थानिक लोक हा पूल तोडतात, नदीत येणाऱया पुरात पूलावरील बांबू वाहून जाऊ नयेत म्हणून हे पाऊल उचलले जाते. हे लोक ब्रिजमध्ये वापरण्यात आलेल्या सर्व बांबूंना जपून ठेवतता. हवामानात सुधारणा होताच दरवर्षी याच बांबूंच्या मदतीने पुन्हा पूल तयार करतात. दरवर्षी स्थानिक लोक हे करत असतात. परंतु कंबोडियात झालेल्या गृहयुद्धादरम्यान हा पूल तोडण्यात आला नव्हता. त्यावेळी हा पूल मजबुतीने उभा राहिला होता.
ट्रकही जातो पूलावरून
हा पूल बांबूंनी तयार केला असला तरीही तो अत्यंत मजबूत आहे. या पूलावरून सायकल, कार, दुचाकी आणि ट्रकही ये-जा करत असतात. हा पूल मेकांग नदीवर तयार करण्यात आला असून तो कोह पेन येथील एक हजार कुटुंबांना काम्पोंग चम शहराला जोडतो.
वापरासाठी द्यावे लागतात पैसे
हा पूल निशुल्क नाही. या पूलावरून जाण्यासाठी स्थानिक लोकांना सुमारे 2 रुपये द्यावे लागतात. तर विदेशी पर्यटकांकडून 80 रुपये घेतले जातात. हा ब्रिज पाहण्याची इच्छा असल्याचे कंबोडियात एप्रिल महिन्यात जाणे योग्य ठरते. तेव्हा हा ब्रिज हटविला जातो आणि लोक नौकेच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जात असतात.