जिराफासारखी लांब मान असणाऱ्या महिला
गळ्यात परिधान करतात रिंग
जगात जितके देश आहेत, तितक्याच मान्यता आहेत. या देशांमध्ये आजही असे अनेक समुदाय राहतात, जे स्वत:च्या प्राचीन मान्यतांचे पालन करत राहिले आहेत. असाच एक समुदाय म्यानमारमध्ये राहतो. या समुदायाच्या महिलांची मान जिराफाच्या मानेसारखी लांब असते, या महिला स्वत:च्या गळ्यात धातूची रिंग परिधान करत असतात. शेकडो पर्यटक या समुदायाच्या गावांमध्ये जाऊन या महिलांसोबत छायाचित्रे काढून घेत असतात. या महिला अखेर धातूची रिंग का परिधान करतात असा प्रश्न पर्यटकांना पडत असतो.
म्यानमारचा कायन समुदाय पितळेद्वारे निर्मित रिंग परिधान करण्यासाठी ओळखला जातो. या समुदायाच्या महिला स्वत:च्या गळ्यात या रिंग एका वर एक अशाप्रकारे परिधान करतात. सर्वात खाली मोठ्या आकाराची रिंग असते, त्यानंतर घटत्या क्रमात या रिंग परिधान केल्या जातात. अशाप्रकारे त्यांची मान लांब होते. या समुदायातील मुली कमी वयापासूनच रिंग परिधान करू लागतात, यामुळे त्यांच्या गळ्याचा आकार बदलत असतो.
महिलांचा गळा जितका लांब तितकी ती सुंदर दिसेल असे या समुदायात मानले जाते. ही ब्रासची रिंग 20 किलोपर्यंत वजनाची असू शकते. या रिंग्ससोबत शेतांमध्ये काम करणे किती अवघड ठरू शकते याचा विचार करून पहा. प रंतु ही प्रथा जेव्हा सुरू झाली, तेव्हा ज्या महिलेचा गळा लांब असेल ती कुरुप दिसेल आणि तिला अन्य समुदायाचे पुरुष पळवून नेणार नाहीत असे मानले जात होते. अशाप्रकारे महिला स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी गळा लांब करवून घेण्याचा प्रयत्न करायच्या.
ज्या गावांमध्ये हे लोक राहतात, तेथे शतकांपासून वाघ आढळतात, हे वाघ माणसांवर हल्ले करत असतात. हल्ल्यात वाघ सर्वप्रथम माणसाच्या मानेवर हल्ला करतो. वाघाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या महिलांनी धातूच्या रिंग गळ्यात परिधान करण्यास सुरुवात केल्याचीही मान्यता आहे.
5-6 वर्षे वयाच्या मुली गळ्यात या रिंग परिधान करू लागतात. या रिंग 20 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध होतात. सद्यकाळात अनेक युवती रिंग परिधान करणे पसंत करत नाहीत. परंतु अनेक लोक या परंपरेला कायम ठेवण्यासाठी रिंग आजही परिधान करतात.