For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यजमान अमेरिकेचा विजयी प्रारंभ

06:58 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
यजमान अमेरिकेचा विजयी प्रारंभ
Advertisement

आयसीसी टी 20 वर्ल्डकप : पदार्पणाच्या सामन्यातच कॅनडा 7 गड्यांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / डलास, अमेरिका

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत यजमान अमेरिकेने रविवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात कॅनडावर एकतर्फी मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात अमेरिकेने टी-20 वर्ल्डकपमधील तिसऱ्या क्रमांकाचे धावांचे आव्हान अवघ्या 17.4 षटकात पूर्ण केले. विशेष म्हणजे, वर्ल्डकपमधील अमेरिकेचा हा पहिला विजय आहे. अवघ्या 40 चेंडूत 4 चौकार व 10 षटकारासह नाबाद 94 धावा करणारा अॅरॉन जोन्स अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Advertisement

विश्वचषकातील पहिला सामना ग्रँड प्रेअरी स्टेडियम येथे खेळवला गेला. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कॅनडाने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावांची धावसंख्या उभारली. सलामीवीर अॅरॉन जॉन्सन व नवनीत धालिवाल या जोडीने 43 धावांची सलामी दिली. डावातील सहाव्या षटकात जॉन्सनला (23 धावा) हरमीत सिंगने बाद करत कॅनडाला पहिला धक्का दिला. परगट सिंग 5 धावांवर धावबाद झाला. यानंतर नवनीत व निकोलस किर्टनने संघाचा डाव सावरला. या जोडीने 62 धावांची भागीदारी केली. नवनीतने 44 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 61 धावांची खेळी केली तर निकोलसने 31 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर अखेरच्या काही षटकात श्रेयस मोवाने फटकेबाजी केली. त्याने 16 चेंडूत नाबाद 32 धावा झोडपल्या. हेलिगर 1 धावेवर नाबाद राहिला.

अॅरॉन जोन्सचे तुफानी अर्धशतक, गॉसचीही फटकेबाजी

195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरच्या रुपाने संघाने पहिली विकेट गमावली. कर्णधार मोनांक पटेलही फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही आणि 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावांची संथ खेळी करत डिलन हेलिगरचा बळी ठरला. यावेळी 2 बाद 42 अशी अमेरिकेची स्थिती होती.

अँड्रिस गॉस व अॅरॉन जोन्स यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 9.1 षटकात 131 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. गॉस-जोन्स जोडीने कॅनडाच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. गॉस 46 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 65 धावा काढून बाद झाला. अॅरॉन जोन्सने 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 94 धावांची नाबाद खेळी करत संघाला 17.4 षटकांतच विजय मिळवून दिला. यासह त्याने अमेरिकेसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही रचला. जोन्सने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. कोरी अँडरसन 3 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

कॅनडा 20 षटकांत 5 बाद 194 (नवनीत धालिवाल 61, निकोल्स किर्टन 51, श्रेयस मोवा नाबाद 32, अली खान, हरमीत व कोरी अँडरसन प्रत्येकी एक बळी).

अमेरिका 17.4 षटकांत 3 बाद 197 (मोनांक पटेल 16, अँड्रिग गॉस 46 चेंडूत 65, अॅरॉन जोन्स 40 चेंडूत नाबाद 94, कोरी अँडरसन नाबाद 3, निखिल दत्ता, कलीम सना व हेलिगर प्रत्येकी एक बळी).

सलामीच्या सामन्यातच अमेरिकेकडून विक्रमांचा पाऊस

  1. टी 20 वर्ल्डकपमधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय - कॅनडाच्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने 17.4 षटकातच विजय मिळवला. टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करताना हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 2016 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 230 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजचे 208 धावांचे लक्ष्य पार केले होते. त्यानंतर आता अमेरिकेने धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली.
  2. अमेरिकेसाठी सर्वात मोठी भागीदारी - कॅनडाविरुद्ध सलामीच्या लढतीत अॅरॉन जोन्स व अँड्रिस गॉस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. टी-20 क्रिकेटमध्ये अमेरिकेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.

  1. अॅरॉन जोन्सची ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी - अमेरिकन अॅरॉन जोन्स या सामन्यात 40 चेंडूत 94 धावांची शानदार खेळी साकारली. आपल्या या खेळीत त्याने 4 चौकार व 10 षटकारांचा पाऊस पाडला. दरम्यान, जोन्सने टी 20 वर्ल्डकपमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. 2007 मधील वर्ल्डकपमध्ये गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 117 धावांच्या खेळीत 10 षटकार मारले होते. तथापि, टी20 वर्ल्डकपमधील सामन्यात सर्वाधिक 11 षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे, जो त्याने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता. जोन्स आता 10 षटकारासह दुसऱ्या स्थानी आहे.
  2. वर्ल्डकपमधील दुसरे महागडे षटक - कॅनडाच्या जेरेमी गॉर्डनने सामन्याच्या 14 व्या षटकात 33 धावा दिल्या. या षटकात त्याने एकूण 11 चेंडू टाकले, ज्यात 3 षटकार, 2 चौकार, 3 वाइड आणि 3 नो बॉल होते. अशाप्रकारे जेरेमीने टी 20 वर्ल्डकपमधील दुसरे सर्वात महागडे षटक टाकले. स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या क्रमांकावर कायम आहे, त्याने 6 चेंडूंत 36 धावा दिल्या होत्या.
  3. अमेरिकेकडून वेगवान अर्धशतक - जोन्स अमेरिकेसाठी टी 20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले.
Advertisement
Tags :

.