Sangli News : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा : आ. रोहित पाटील यांची मागणी
तहसील कार्यालयासमोर आ. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण
तासगाव : अवकाळी कोसळून शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. ओल्या ढगांनी पेरणीपासून हंगामापर्यंत सर्व श्रम वाहून नेले. असे स्पष्ट करून राज्य शासनाने त्वरित कर्जमाफी करून ओला दुष्काळ करावा अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली.
तर शेतकऱ्यांच्या घरात दुःखाचे सावट दाटून आले आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने दिलासा द्यायचा सोडून ज्येष्ठ नेत्यांवर टिका आणि इशारा सभा कशासाठी घेताय असा सवालही आ. पाटील यांनी केला. शेतक्रयांचे हित डोळ्यासमोर ठेवून बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने, कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आ. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, सुमंत पाटील, सुरेश पाटील, देवराज पाटील, विवेक कोकरे, विश्वास तात्या पाटील गजानन खुजट उपस्थित होते. तर आमदार जयंत पाटील यांनी पत्र देऊन उपोषणाला पाठिंबा दिला, तरआ विश्वजीत कदम यांनी फोन करून पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, "आज शेतकऱ्यांची लेकरं उपाशी आहेत. लोक त्रस्त आहेत. पण सरकारमधील नेते विरोधकांवर टिका करण्यात व्यस्त आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजूनही अतिवृष्टीग्रस्त भागाची फिरस्ती केलेली नाही. पण विरोधी पक्षांना इशारा देण्यात मात्र त्यांना रस आहे.
निकष लावण्यापलीकडे सरकारने त्याला भरघोस मदत करणे गरजेचे आहे. पूरग्रस्तांना मदत करायला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे माझ्या कानावर आहे असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने त्वरित कर्जमाफीचा निर्णय घ्यावा तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र करू असा इशाराही आमदार रोहित पाटील यांनी यावेळी दिला.