सुनियोजीत सेकंड इनिंग ठरेल आशादायी...
त्या दिवशी सकाळीच फोन वाजला.
हॅलो. नमस्कार मॅडम मी कुणाल. पाच मिनीटे आपल्याजवळ बोलु शकतो का? हो..बोला ना. मॅम माझी आई स्नेहा..तिच्या संदर्भात थोडं बोलायचं होतं. हं..
मॅम, आम्ही दोन भावंडे. माझे वडिल आमच्या बालपणीच गेले. आईने खूप कष्ट घेत, नोकरी करत आम्हाला उत्तम शिक्षण दिले. माझा मोठा भाऊ विदेशात असतो. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. तो काही दिवस आईला तिकडे न्यायचे म्हणतो आहे. बरं..पुढच्याच महिन्यात आईचा पासष्ठावा वाढदिवस आहे. मला तो अगदी दणक्यात साजरा करायचा आहे.
व्वा!! चांगली गोष्ट आहे.
हो. परंतु आई त्याला नकार देते आहे.
का? काही विशेष कारण?
तसे काही बोलली नाही ती. पण.. वाढदिवस वगैरे नकोच म्हणतेय. गेले काही दिवस ती थोडी दडपणाखालीच वाटते आहे. खरंतर ती खूप हौशी आहे. पण असे का म्हणते काही कळत नाही. आम्ही दोघेही दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतो. नातवंडे तिच्याकडेच असतात. इतके वर्ष छान करायची त्यांचेही. परंतु अलीकडे तिची चिडचिड जाणवते. ती म्हणते, ‘आता कसलेही सेलिब्रेशन नको. वृद्धापकाळाचे कसले सेलिब्रेशन.. मला काहीही नकोय आता. परवा तर फारच अस्वस्थ दिसत होती.
मॅडम मी खूप गोंधळून गेलो आहे. मी बोलायचा प्रयत्न केला परंतु ती काही सांगत नाही. काहीनाही म्हणून शांत राहते. तिला तुमच्याकडे घेऊन येणार होतो.
बरं. ठीक आहे म्हणत भेटीची वेळ देऊन मी फोन ठेवला.
या केसमधील स्नेहा ताईंच्या समस्येचा मला थोडा अंदाज आला होता. परंतु त्यांच्यासाठी व्यक्त होणं, मोकळेपणाने बोलणे गरजेचे होते. अनेक कारणांमुळे नको वाटणारी वृद्धत्वाची वाटचाल, ज्येष्ठांचे वाढते मानसिक ताणतणाव, वेगवेगळ्या समस्या विविध व्यक्तींच्या माध्यमातून समोर येत असतात.
खरंतर शैशव, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धावस्था या साऱ्या नैसर्गिक अवस्था..! परंतु शरीराची क्षीण होत चाललेली क्षमता, एकाकीपणाची भावना, शारीरिक व्याधी, मर्यादित आर्थिक उत्पन्न, कौटुंबिक ताणतणाव यासारख्या अनेक कारणांनी मनावरचा ताण वाढून आपण वृद्धत्वाकडे झुकतो आहे या जाणीवेनेच मनामध्ये ‘चिंता’ उत्पन्न होऊ शकते. प्रत्येकाच्या कुटुंबातील परिस्थितीनुसार वा त्या त्या व्यक्तीच्या प्राप्त परिस्थितीनुसार त्यांचे प्रश्नही भिन्न भिन्न असू शकतात परंतु ज्येष्ठ नागरिकांचा वाढता मानसिक ताण ही एक समस्या बनू पाहते आहे, हे मात्र आजुबाजुला पाहिल्यावर स्पष्ट होतेच.
अर्थात ज्येष्ठांच्या ताणतणावाची अनेक कारणे सांगता येतील. जोडीदारापैकी कुणा एकाचे नसणे हेही उतारवयामध्ये अनेकांच्या तणावाचे कारण असू शकते. काही वेळा मुलांचे विवाह झाल्यावर मुलांचे विभक्त होणे अनेकांना त्रासदायक वाटते तर काहींच्या बाबतीत मुलांवरील अतीव प्रेमापोटी त्यांच्या जोडीदारासोबत करावी लागणारी तडजोड(मग ती सुन असो वा जावई)ज्येष्ठांचा मानसिक तणाव वाढवणारी ठरु शकते.
अनेकदा नातवंडांच्या सांभाळासाठी करावी लागणारी धावपळ उतारवयात तणावपूर्ण ठरु शकते. स्वत:च्या मुलांना सांभाळत असताना स्वत:च्या निर्णयाने वागता येते. परंतु नातवंडे सांभाळताना अनवधानाने काही चूक तर होणार नाही ना याचे नकळत दडपण असते. शिवाय मधल्या कालखंडात लहान मुले अवतीभोवती असणं, त्यांना सांभाळणं ही सवय साहजिकच मोडलेली असते. वय वाढत चालल्याने शरीर लवकर थकते. त्यातच मुलांच्या चौकशीसाठी सूचनावजा पालकांचे फोन येत असतील तर पहायलाच नको. त्यातच नातवंडांना शाळेत सोडण्याची-आणण्याची जबाबदारी आजी आजोबांवर असेल तर या वयात कमी होत चाललेल्या आत्मविश्वासामुळे रस्त्यावरची गर्दी, दुतर्फा वाहने, वाहनांचा वेग जीवाला घोर लावतात.
काही ज्येष्ठांच्याबाबतीत मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकणारी एक गोष्ट म्हणजे विदेशी असलेल्या सुनेच्या वा मुलीच्या बाळंतपणासाठी करावे लागणारे परदेशगमन आणि तिथला काही महिन्यांचा मुक्काम!!
आपल्या घरापासून लांब जाण्याची हुरहुर, न मानवणारा हवामानातील बदल, भाषेची अडचण, तिथला नगण्य जनसंपर्क आणि समजा जायला ठाम नकार द्यावा तर आपण आपल्या कर्तव्याला चुकलो अशी मनात येणारी अपराधीपणाची भावना. या साऱ्या गोष्टी तणाव वाढवणाऱ्या ठरु शकतात. मग सुरवातीच्या उदाहरणातील स्नेहाताईंसारखी वार्धक्याकडे होणारी वाटचाल कटकटीची वाटू शकते.
ज्येष्ठांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या इतरही अनेक गोष्टी आहेत. वृध्दापकाळाकडे वाटचाल सुरु झाली की अनेक स्थित्यंतरे होतात. शरीर लवकर थकायला लागते. पूर्वीइतका कामाचा उरक होत नाही. अनेकांची दृष्टी, श्रवणशक्ती क्षीण होऊ लागते. कुणाला काही व्याधी जडतात, दंतपंक्ती मोकळ्या होतात, तेल न घातलेल्या बीजागरांसारखे सांधे कुरकुरु लागतात, विस्मरण होऊ लागते. मानसिक स्तरावरही या साऱ्या गोष्टींमुळे या व्यक्ती फार संवेदनशील बनतात. हळवेपणा वाढतो.. जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. आपली उपयुक्तता कमी झाली आहे का? आपली कुणाला अडचण तर होत नाही ना? आपण अडगळ तर बनणार नाही ना? अशा अनेक विचारांची मालिकाच सुरु होते. त्यात एखादी व्यक्ती मुळातच हट्टी असेल तर हेकटपणा वाढण्याची शक्यता अधिकच बळावते. काहीवेळा जिद्दीने काम करण्याचा अट्टाहास केला जातो. परंतु कधीतरी निवांतपणा ही प्रत्येकाची गरज असते. शिक्षण, नोकरी, मुलं-बाळं, संसार, मुलांची लग्न हे सारे तरुणपणी सहज निभावून नेतो. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे हे जमेनासे होते आणि त्यामध्ये वावगेही काही नसतेही. कोणतीही अपराधीपणाची भावना मनात न आणता या गोष्टीचा स्विकार आणि मोकळेपणाने (मुलांजवळ अमुक गोष्ट मला जमत नाही.)तसे सांगणे गरजेचे आहे. काही गोष्टी योग्य रीतीने व्यक्त करत ‘नाही’ म्हणणे बरेचसे तणाव हलके करु शकते.
तसेच ज्येष्ठांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बदल होणे हा कोणत्याही गोष्टीचा स्थायीभाव आहे. आपण तो स्वीकारला नाही तरी तो होतच असतो. आपली वृद्धापकाळाकडची वाटचाल ही नैसर्गिक अवस्था आहे. आर्थिक नियोजन, स्वत:च्या छंदांची जोपासना, सुरुवातीपासूनच शारीरिक तंदुरुस्तीसाठीचे विशेष प्रयत्न, दृष्टिकोनातील बदल, तरुण मंडळींची बदलती जीवनशैली, राहणीमान याकडेही थोड्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने वाटचाल झाली तर ‘सुनियोजीत सेकंड इनिंग’ सुखावह बनू शकते.
तसेच तरुण पिढीनेही ज्येष्ठांकडे आदराने पहात आपण किती जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवायच्या याचेही भान राखायला हवे. तसेच old age needs so little, but needs that little so much! हे लक्षात ठेवून थोडा वेळ त्यांना दिला, आस्थेने चौकशी केली तर ज्येष्ठांचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होऊन नात्याची वीण अधिक घट्ट होईल हे मात्र निश्चित!
-अॅड. सुमेधा संजिव देसाई