सुशिक्षिताला इच्छाचक्राची दाहकता जास्त जाणवते
अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, काम व क्रोध ह्यांनी सर्व जगाला वेढून टाकले आहे. निरनिराळ्या इच्छा आणि त्या पूर्ण होत नाहीत असं दिसलं की, लोकांना राग अनावर होतो. म्हणून माणसाने निरिच्छ होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे क्रोधापासून त्याची आपोआपच सुटका होईल. वेगवान, तृप्ती करण्यास अशक्य व अग्निप्रमाणे दाहक अशा इच्छारुपी शत्रूने ज्ञानी मनुष्याचे ज्ञान सतत आच्छादिलेले आहे ह्या अर्थाचा प्रतिपत्तिमतो ज्ञानं छादितं सततं द्विषा । इच्छात्मकेन तरसा दुष्पोष्येणच शुष्मिणा।।39।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार माणसाला वेळोवेळी होणाऱ्या इच्छा त्याला त्याचे मूळ स्वरूप विसरायला लावतात. तो स्वत:ला कर्ता समजतो आणि इच्छापूर्ती होण्यासाठी, त्याच्या दृष्टीने, त्याला अनुकूल घटना घडवण्यासाठी धडपडू लागतो. म्हणून बाप्पा म्हणतात मनुष्याला होणाऱ्या निरनिराळ्या इच्छा या त्याच्या शत्रू आहेत हे माणसाने कायम लक्षात ठेवावे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा.
इच्छा पूर्ण झाल्या तरी कालांतराने त्यातील नावीन्य संपल्यामुळे किंवा त्या इच्छेतून मिळवलेल्या गोष्टी संपल्यामुळे वाईट वाटू लागते आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तरी दु:ख होतेच. तेव्हा दोन्ही प्रकारे दु:खच देणारा हा शत्रू अत्यंत वेगाने माणसावर हल्ले करत असतो. माणसाला एकापाठोपाठ एक होणाऱ्या इच्छांचा वेग जर लक्षात घेतला तर बाप्पा या इच्छारूपी शत्रूला वेगवान का म्हणतात ते लक्षात येईल. ज्याप्रमाणे अग्नीत लाकडं घातली की तो आणखीनच भडकतो त्याप्रमाणे एक इच्छा पूर्ण झाली की, त्याला हुरूप येतो आणि त्यातून नव्या इच्छेचा जन्म होतो. हे असं एकापाठोपाठ एक असं इच्छांचे चक्र आयुष्यभर माणसाच्यामागे भडकलेल्या अग्निसारखं लागलेलं असतं आणि मनुष्य त्याची दाहकता सोसत जगत असतो. ज्ञानी मनुष्य या दाहकतेचा जास्त अनुभव घेतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
आश्रित्य बुद्धिमनसी इन्द्रियाणि स तिष्ठति ।
तैरेवाच्छादितप्रज्ञो ज्ञानिनं मोहयत्यसौ ।। 40 ।।
अर्थ-बुद्धि, मन व इंद्रियें यांचा आश्रय घेऊन कामना माणसाच्या मनात राहतात. त्या बुद्धीला आच्छादित करून इंद्रियांच्या सहाय्याने ज्ञान्याला मोहात पाडतात.
विवरण- ज्ञानी माणसाला त्याच्या ज्ञानाची घमेंड असते. इतरांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतंय असा त्याचा समज असतो. त्यामुळे तो करतोय ते बरोबरच आहे असा अहंकार त्याला वाटत असतो. त्याच्या अहंकारी मनात विविध इच्छा होत असतात. स्वत:ला कर्ता समजत असल्याने कधी बुद्धीची संमती घेऊन, तर कधी परस्परच तो त्याची इच्छा इंद्रियांच्याकडून विषयांची माहिती घेऊन पूर्ण करून घेतो. लोकमान्य टिळक गीतारहस्य ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथात म्हणतात, माणसाच्या बुद्धीचे दोन भाग असतात. पहिला भाग एखाद्या निर्णयातली चांगली बाजू कोणती आणि वाईट बाजू कोणती हे सांगण्याचे काम करत असतो तर दुसरा भाग अमुक अमुक निर्णय घेतला तर आपला फायदा आहे असे स्वार्थ साधून देणारा सल्ला देत असतो पण जो ज्ञानाच्या घमेंडीत असतो त्याचे त्याच्या बुद्धीच्या विवेकी भागाकडे म्हणजे चांगले काय आणि वाईट काय हे सांगणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष होते आणि बुद्धीच्या स्वार्थी भागाचे मनाशी एकमत होते. दुर्योधनाचे असेच झाले होते. स्वत:ला शहाणा समजण्याच्या नादात तो इतका वाहवत गेला की, पांडवांचा न्याय्य वाटा सुद्धा द्यायची त्याच्या मनाची तयारी नव्हती. भीष्म, द्रोण इत्यादि जेष्ठ मंडळी व स्वत: भगवंत त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत होते पण स्वत:च्या स्वार्थापोटी तो कुणाचेही ऐकून घ्यायला तयार नव्हता कारण त्याच्या बुद्धीवर स्वार्थाचे आच्छादन पडले होते.
क्रमश: