बुलडोझरवरून योगी-अखिलेश यांच्यात वाक्युद्ध
दोन्ही नेत्यांकडून परस्परांवर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात बुलडोझरवरून वाक्युद्ध पेटले आहे. बुलडोझरमध्ये मेंदू नसतो, स्टीअरिंग असते, आता स्टीअरिंग कधी दिल्लीवाले किंवा जनता खेचेल माहित नाही. योगींचा बीपी वाढला आहे, त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे असे अखिलेश यादव यांनी योगींना उद्देशून म्हटले आहे. तर यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझर चालविण्यासाठी हिंमत असावी लागते असे अखिलेश यादव यांना सुनावले होते.
बुलडोझरबद्दल बोलणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे का हे सांगावे. भाजप सरकारने केवळ स्वत:च्या हितासाठी बुलडोझरचा वापर केला आहे. लोकांना कमी लेखण्यासाठी त्यांनी बुलडोझर चालविला आहे. भाजप सरकार घटनाविरोधी कृत्य करत असल्याची टीका अखिलेश यांनी केली.
समाजवादी पक्षाला जेव्हा सत्ता मिळाली होती, तेव्हा त्योन स्वत:च्या अराजक आणि भ्रष्ट कारवायांमुळे राज्याला संकटात लोटले होते. समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशच्या जनतेला दंगलीच्या आगींमध्ये लोटण्याचे काम केले होते. समाजवादी पक्षाच्या सरकारने जाती-जातींमध्ये भांडण लावली होती. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना उत्तरप्रदेश दंगलीच्या आगीत होरपळत होते. हेच अखिलेश यादव आता नव्या रुपात जनतेची दिशाभूल करण्यासाठी समोर आले आहेत असा आरोप योगींनी केला आहे.
बुलडोझर प्रत्येक जण चालवू शकत नाही. बुलडोझर चालविण्यासाठी दृढ निश्चय असावा लागतो. दंगलखोरांसमोर मान तुकविणारे लोक बुलडोझर चालवू शकत नाहीत.असे म्हणत योगींनी अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे.