जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ
रामबन येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींचे आश्वासन
वृत्तसंस्था/ रामबन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या रामबन येथे सभा घेत काँग्रेसच्या प्रचारमोहिमेला प्रारंभ केला आहे. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांनी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. यादरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरमधील बेरोजगारी, वीज समस्या तसेच देशात कथित स्वरुपात फैलावलेल्या द्वेषावर वक्तव्य केले आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाचा राज्याचा दर्जा हिरावून घेण्यात आला आहे. एक राज्य संपुष्टात आणले आणि लोकांचे अधिकार हिरावून घेण्यात आले. पूर्ण देशात भाजप आणि संघाचे लोक द्वेष आणि हिंसा फैलावत आहेत. त्यांचे काम द्वेष फैलावण्याचे तर आमचे काम प्रेम पसरविण्याचे आहे. ते तोडतात आणि आम्ही जोडतो. द्वेषावर प्रेमानेच विजय मिळविला जाऊ शकतो असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
केवळ जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला नसून लोकांचे अधिकार, संपत्ती, सर्वकाही हिसकावून घेतले जात आहे. 1947 मध्ये आम्ही राज्यांना हटवून लोकशाहीवादी सरकार स्थापन पेले, आम्ही देशाला घटना दिली, आज जम्मू-काश्मीरमध्ये राजा असून त्याचे नाव उपराज्यपाल आहे. आम्हाला प्रथम जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून द्यावा लागणार आहे. निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा मिळावा अशी आमची इच्छा होती. परंतु केंद्र सरकार प्रथम निवडणूक व्हावी आणि मग राज्याच्या दर्जावर चर्चा करण्यात यावी या मताचे आहे. भाजपची इच्छा असो किंवा नसो इंडिया आघाडी त्याच्यावर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी दबाव टाकणार असल्याचे राहुल गांधी यांनी सभेत म्हटले आहे.
बेरोजगारीचे प्रमाण अधिक
केंद्र सरकार केवळ अदानी आणि अंबानी यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या उर्वरित हिस्स्यांपेक्षा अधिक बेरोजगारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कधीच बेरोजगारीबद्दल बोलत नाहीत. काँग्रेस पक्षाचे आघाडीचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येणार आहे. आम्ही येथील सर्व रिक्त शासकीय पदे भरणार आहोत. तसेच नियुक्तीसाठीची वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत वाढविणार आहोत. आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती देऊ आणि त्यांचे उत्पन्न वाढवू. सर्वांना बरोबर घेत जम्मू-काश्मीरचे सरकार चालविणे हे आमचे लक्ष्य असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानच्या जनतेला घाबरतात. आता फार कमी वेळ शिल्लक राहिला आहे. आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून हटविणार आहोत. देशात बंधूभाव असावा, सर्वांचा सन्मान व्हावा, परस्परांशी उत्तम संवाद असावा अशी आमची इच्छा असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी सभेदरम्यान केले आहे.
आमचे सरकार आल्यास....
काश्मीर अत्यंत सुंदर स्थळ आहे, निवडणुकीनंतर मला येथे यावेच लागेल. अशी जागा आणि इतके प्रेमळ लोक कुठेच दिसून येत नाहीत. काही काळानंतर आमचे सरकार स्थापन होईल आणि आम्ही लोकांसाठी पूर्ण मनाने काम करणार आहोत असे राहुल गांधी यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले आहे.
तीन टप्प्यांमध्ये मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. कलम 370 संपुष्टात आल्यावर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. यानंतर तेथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. ही निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. 90 विधानसभा मतदारसंघांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
काँग्रेसची एनसीसोबत आघाडी
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी केली आहे. राज्यातील 32 जागांवर काँग्रेस तर 51 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स उमेदवार उभा करणार आहे. तर 5 जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार असून यात बनिहाल, डोडा, भद्रवाह, नगरोटा आणि सोपोर मतदारसंघ सामील आहे.