केवळ दोन लोकांचे गाव
जगात दोन प्रकारचे लोक असतात, यातील एक प्रकारचे लोक स्वत:च्या प्रगतीसाठी स्वत:चे मूळ गाव-शहर सोडण्यास तयार असतात. हे लोक आयुष्यात नवा टप्पा करण्यासाठी स्वत:चे घर, कुटुंब सर्वकाही मागे सोडत असतात. तर काही लोक कुठल्याही स्थितीत स्वत:च्या मूळ ठिकाणाशी जोडलेले राहू इच्छितात. अशा लोकांना सुविधांचा अभाव मान्य असतो, परंतु ते स्वत:चा देश, गावातच राहू इच्छितात, याकरता भले मग त्यांना कुठलीही किंमत मोजावी लागली तरीही त्यांची तयारी असते.
रशियात राहणारे एक जोडपे दुसऱ्या प्रकारात सामील आहेत. या जोडप्याने स्वत:चे गाव सोडण्यास नकार दिला आहे. यामुळे सद्यकाळात स्वत:च्या गावात राहणारे केवळ हे दोघेच उरले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त या गावात अन्य कुणीच राहत नाही. दोघांनाही सोबत म्हणून या गावात काही प्राणी मात्र आहेत. हे जोडपे आणि काही प्राण्यांना वगळल्यास या गावात अन्य कुणीच दिसून येत नाही.
या जोडप्यासोबत या गावात गाय, मांजर, श्वान, काही डुक्करं, कोंबड्यांचे अस्तित्व दिसून येते. या प्राण्यामुळे या गावात राहण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते असे या जोडप्याकडून सांगण्यात आले. पती-पत्नी दोघेही या प्राण्यांवर भरपूर प्रेम करतात. अलिकडेच या गावात एका वासराचा जन्म झाला आहे. या जोडप्याने या वासराला डॉटर हे नाव दिले आहे. कधीकधी काही लोक आम्हाला भेटायला येत असतात. ते या गावातून इतर ठिकाणी राहण्यास जाण्याची सूचना करतात, परंतु आमची अशी कुठलीच इच्छा नाही. येथे राहण्याची आम्हाला भीती वाटत नसल्याचे या जोडप्याने म्हटले आहे.