फरशीखाली मिळाले 100 वर्षे जुने प्रेमपत्र
प्रेमपत्रातून समोर आली रंजक माहिती
कधीकधी एखाद्या जुन्या घराच्या कपाटात किंवा भिंतीत असे काहीतरी सापडते जे दशकांपेक्षा जुने असते. कधी हा खजिना असतो तर कधी जुने रहस्य. अलिकडेच ब्रिटनच्या एका परिवारासोबत काही असेच घडले आहे. 48 वर्षीय ड्वान कोर्न्स या स्वत:च्या 14 वर्षीय मुलासोबत घराची सफाई करत असताना अचानक 55 इंचाचा टीव्ही फ्लोअरवर कोसळला, यामुळे त्या ठिकाणच्या टाइल्स तुटल्या, परंतु या टाइल्सखाली जे सापडले ते हैराण करणारे होते.
तेथे एक अत्यंत जुने प्रेमपत्र सापडले असून ते रोनाल्ड हॅबगुड नावाच्या एका व्यक्तीने एका विवाहित महिलेला लिहिले होते. यात दोघांच्या गुप्त प्रेमसंबंधांचा उल्लेख होता. ड्वान यांनी हे पत्र एका फेसबुक ग्रूपमध्ये पोस्ट केले आहे. या पत्रात रोनाल्ड यांनी स्वत:च्या प्रेयसीला भेटण्यासाठी येण्याची गळ घातली होती. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, तुला भेटण्याच्या प्रतीक्षेत आहे असे पत्रात लिहिले गेले आहे.
पत्रावर तारीख नमूद नाही, परंतु हे घर 1917 मध्ये निर्माण करण्यात आले होते. तर ड्वान या मागील महिन्यात या घरात राहण्यासाठी आल्या होत्या, त्यांना या घरात यापूर्वी कोण राहत होते याविषयी फारशी माहिती नाही. अन्य ऑनलाइन डिकोडर्सनी लेखन आणि कागदाचा आकार पाहता हे पत्र 1920 च्या दशकातील म्हणजेच सुमारे 100 वर्षे जुने असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. पत्र खूपच जुने असून यात ट्राम्सचा उल्लेख आहे. सुमारे 80 वर्षांपूर्वीच शहरातील ट्रामसेवा बंद झाली आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी ऑनलाइन आर्काइवच्या माध्यमातून रोनाल्ड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही.