For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुरुपी शिक्षक

06:03 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहुरुपी शिक्षक
Advertisement

‘तुला मोठेपणी कोण व्हायचंय?’ असा प्रश्न मुलांना विचारला की, ‘डॉक्टर, इंजिनिअर, सॉफ्टवेअर तज्ञ’ अशी उत्तरे पटापट यायला लागतात. शिक्षक किंवा शास्त्रज्ञ व्हायचंय, अशी आकांक्षा असणारे क्वचित. बहुसंख्य शिक्षकांना देखील आपली स्वत:ची मुलं शिक्षक व्हावीत, असं क्वचित वाटतं. डॉक्टरला आपला मुलगा डॉक्टर व्हावा, असं वाटतं. इंजिनिअरला आपला मुलगा इंजिनिअर व्हावा, असं वाटतं. चार्टर्ड अकौटंट आणि वकिलाला आपल्या मुलांनी आपला व्यवसाय पुढे चालवावा, असं वाटतं. पण आपला मुलगा आपल्यासारखा शिक्षक व्हावा, अशी उदाहरणं नाहीत.

Advertisement

डॉक्टर, वकील, इंजिनिअर आपली स्वत:ची ओळख करून देतांना स्वाभिमान डोकावतो. आपण हीन, दीन आहोत, असं जाणवत नाही. ‘मी शिक्षक आहे’, असं सांगत असताना शिक्षकाची देहबोली पाहण्यासारखी असते. सार्थ अभिमान दिसत नाही. भाषा, स्वर, भावमुद्रांतून काय जाणवतं? एक प्रकारची खंत, न्यूनगंड दिसतो. शिक्षकाला आपल्यापेक्षा डॉक्टर, वकील, इंजिनिअर अधिक श्रेष्ठ वाटतात. ज्याच्यापाशी आत्मसन्मान नाही, त्याला दुसरे कसे मान-सन्मान देतील?

शिक्षकाने स्वत:ची नीट ओळख करून घेतली, स्वत:चा शोध घेतला तर त्याला अशी खंत वाटणार नाही. थोडीशी दृष्टी आत वळवली तर त्याला स्वत:मध्येच कोण कोण दडलेले आहेत, याचा साक्षात्कार होईल. डॉक्टर, वकील, इंजिनिअर इ. सारे शिक्षकामध्ये आहेत आणि हे व्यावसायिक घडवणाराही शिक्षकच आहे. म्हणजे मूळ शिक्षकच आहे. हे सर्वजण शिक्षकाच्या वर्गातूनच पुढे गेलेले आहेत.

Advertisement

शिक्षक वर्गात आणि वर्गाबाहेर विविध रुपे धारण करत असतो. किंबहुना प्रसंगानुरुप अशी वेगवेगळी रुपं धारण करू शकणारा शिक्षकच यशस्वी शिक्षक होतो. याच शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर आयुष्यभर प्रभाव राहतो. शिक्षकाला डॉक्टर, इंजिनिअर, तत्त्वज्ञ, धर्मोपदेशक, आय.टी. विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, नट, कलाकार, सारथी अशा विभिन्न भूमिका वठवाव्या लागतात. तो बहुरुपी असतो. त्याच्या वेगवेगळ्या रुपांविषयी थोडंसं बघू.

1) दार्शनिक, तत्त्वज्ञ (फिलॉसॉफर)

सामान्यपणे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत तत्त्वज्ञान हा एक स्वतंत्रपणे शिकवण्याचा विषय नसतो. महाविद्यालय स्तरावर तो एक ऐच्छिक विषय असतो. ज्यांना या विषयात विशेष रुची असते, असे विद्यार्थी हा विषय निवडतात. त्याच विषयात अधिक रस घेतात. शोधही करतात पण प्रत्येकाचं जीवन विषयक तत्त्वज्ञान असतं. तसं ते असावं, अशी अपेक्षा असते. जीवनातील प्रत्येक कृतीवर या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असतो. तत्त्वज्ञानाची बैठक असेल तर कृती अर्थपूर्ण होते. विद्यार्थ्यांची ही बैठक शिक्षक घडवत असतो. अर्थांत त्यासाठी शिक्षकाला स्वत:ला तशी बैठक असणं महत्त्वाचं. जे विषय शिकवले जातात, त्यातही नुसतं परीक्षेपुरतं शिकून आणि शिकवून पेपरमध्ये उत्तम गुण मिळवणं पुरेसं नाही. पेपरमधल्या गुणांपेक्षा अंगी अधिक गुण आले तर शिकणं-शिकवण्याचं सार्थक झालं. ही दृष्टी मिळणं-देणं हे तोच शिक्षक करू शकतो, ज्याला स्वत:ला, स्वत:चं असं जीवन विषयक चिंतन आणि दृष्टी आहे.

2) डॉक्टर

शिक्षकाकडे थर्मामीटर, स्टेथोस्कोप यासारखी उपकरणं नसली तरीही त्याला डॉक्टरची भूमिका निभवावी लागते. मैदानावर शारीरिक कार्यक्रम करताना मुलं पडतात. इजा होते. अशावेळी सर्वांत प्रथम शिक्षकालाच धावून जावं लागतं. प्रथमोपचार करावे लागतात. पण शारीरिक जखमांपेक्षा मनावर आघात होण्याचे प्रसंग अधिक येत असतात. हे आघात चट्कन कळत नाहीत. जखमा दिसत नाहीत. पण शारीरिक जखमांपेक्षा आघात भरून यायला अधिक वेळ लागतो. हे आघात, जखमा ज्या शिक्षकाच्या चट्कन लक्षात येतात, तो शिक्षक थोरच. मान-अपमान, यश-अपयश, आशा-निराशा यांची आवर्तनं सुरूच असतात. यशाच्यावेळी शाबासकी, अपयशाच्या वेळी आधार देणं हे शिक्षकानं करावं, अशी अपेक्षा असते. हे काम डॉक्टरच्या कामापेक्षाही नाजूक आहे. सगळ्यांच्याच ते लक्षात येतं असं नाही. आणि लक्षात आलं तरी सगळेच ते करतात, असंही नाही. शिक्षकाचं हे रुप अनेकांना कळतही नाही, दिसतही नाही.

3) अभियंता (इंजिनिअर)

मोठ-मोठे प्रकल्प, कारखाने थक्क करून सोडतात. हे सर्व उभं करणाऱ्यांचं कौतुक, अभिमान वाटतो. या यंत्र आणि तंत्राने मानवी जीवन सुखकर केलं आहे. पण दिसणाऱ्या यंत्र आणि तंत्रामागे न दिसणारा मंत्र असतोच. त्याशिवाय यंत्र (मशिनरी) अस्तित्वात येऊच शकत नाही. असे अभियंता घडविण्याचे काम म्हणजेच जगाच्या भविष्याची पायाभरणी करण्याचे काम शिक्षक करत असतो. एका अर्थाने भविष्य घडविण्यासाठी माणसं घडविण्याचं अगदी मूलभूत काम करण्याची संधी शिक्षकाला मिळाली आहे. जसा पाया दिसत नाही, तसा शिक्षकही दिसत नाही इतकंच.

4) पुजारी/धर्मोपदेशक

आपल्या देशात शाळेला सरस्वती मंदिर, विद्यामंदिर म्हणतात व सरस्वती ही विद्यार्थ्याची कुलदेवता आहे. शिक्षक हा सरस्वतीच्या मंदिरातील पुजारी आहे. ही पूजा उपचार नाही. प्रतिमा, मूर्तीची पूजा हा केवळ प्रारंभ बिंदू. ही सगुण भक्ती. ज्ञानाची पूजा, भक्ती ही निर्गुण भक्ती. शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांना या सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीपर्यंत जायला मदत करायची असते. आपला विद्यार्थी सच्चा ज्ञानोपासक व्हावा, अशी खऱ्या शिक्षकाची तळमळ असते. ही ज्ञानतृष्णा जेव्हा विद्यार्थ्याच्या मना-जीवनात उतरते, तो क्षण विद्यार्थी व शिक्षकाच्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण.

5) वैज्ञानिक/शास्त्रज्ञ

शिकवण्याचंही एक विज्ञान, शास्त्र आहे. त्याला शिक्षण शास्त्र म्हणतात. हे शिक्षण शास्त्र आणि शिकवण्याच्या पद्धतींचा (पेडागॉजी) अभ्यास आणि पकड असल्याशिवाय अध्यापन-अध्ययन प्रभावी होऊ शकत नाही. शिक्षकाला सर्व विषय, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व वेळी एकाच पद्धतीनं शिकवतां येत नाही. प्रसंग, विद्यार्थी, विषयानुरुप बदल करावे लागतात. नवनवीन प्रयोग करावे लागतात. वर्ग ही त्याची प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) बनते. एका पद्धतीनं शिकवून कळत नसेल तर नव्या पद्धतीनं शिकवावं लागतं. बी. एड आणि अन्य शिक्षक-प्रशिक्षणात शिक्षक जे शिकला तेही अनेकवेळा अपुरं, थीटं पडतं. त्यातलं बरंचसं कालबाह्या झालेलं असतं. वर्ग नावाच्या प्रयोगशाळेत शिक्षक सतत प्रयोगशील राहिला तर त्याचं अध्यापन जीवंत, ताजं, रसरशीत राहील. बरं वस्तू आणि रसायनावर प्रयोग करणं, त्या मानाने सोपं. शिक्षकाला तर बहुरंगी, बहुढंगी, बहुरुपी, बहुविकारी अशा मनावर प्रयोग करायचे असतात. हे काम कठीण, आव्हानात्मक तर आहेच पण त्याचवेळी ते कलात्मक, सृजनात्मक आणि आनंददायकही आहे.

6) कलाकार/कलावंत

आनंद निर्मिती हा अध्ययन-अध्यापनाचा प्रारंभ आहे. आनंदी मनोवस्थेशिवाय प्रभावी शिकणं-शिकवणं होऊच शकत नाही. शिक्षक आणि शिकणारा दोघेही प्रसन्न, आनंदी असतील तरच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया परिणामकारक बनते. रटाळपणा असेल तर प्रभावशून्य बनते. अनेक शिक्षकांकडे विषयाचं ज्ञान भरपूर असतं. पकड चांगली असते. पण त्यांचं सादरीकरण (डेलीव्हरी व प्रेझेंटेशन) सुमार दर्जाचं असल्यामुळे मुलंही कंटाळतात. शब्दांच्या जोडीला हावभाव, देहबोली, सुयोग्य स्वर, आवाजाची पट्टी, शारीरिक हालचाली या सगळ्यांचा योग्य मेळ हवा. शिकवणं रोचक, रंजक हवं. शिक्षकाला अभिनेता, कलावंत, नर्तक, गायक, विनोदाची पखरण करणारा व्हावं लागतं. हे शिक्षकांचे रुप विद्यार्थ्यांना खूप भावतं आणि आयुष्यभर लक्षातही राहतं. हे करत असताना आपण मुलांना हसवणारे, मनोरंजन करणारे जोकर, विदुषक बनणार नाही, याची काळजीही घ्यावी लागते.

7) सारथी (ड्रायव्हर)

विशेषत: पौगंडावस्थेत मुलं भरकटतात. स्वप्नं बघतां बघतां मार्गावरुन घसरतात, विचलीत होतात. आजूबाजूच्या झगमगीत, लखलखणाऱ्या जगाकडे पाहात पाहात वाट हरवतात. अभ्यास आणि एकूणच जीवनावर विपरित परिणाम होतात. अशा कठीण आणि नाजूक वेळी विद्यार्थ्याला परत योग्य मार्गावर आणण्याचं काम चालक बनून शिक्षकाला करावं लागतं. अनेक शिक्षकांनी भरकटलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचं काम केल्याची भरपूर उदाहरणं आहेत.

8) आय.टी. तज्ञ

एकविसाव्या शतकातील शिक्षकाला युगानुकूल असं हे नवं रुपही धारण करावं लागतं. अन्यथा शिक्षक कालबाह्या ठरेल. हे नवं तंत्रज्ञान शापही आहे आणि वरदानही आहे. पण त्यापासून पळून जाता येणार नाही. कोरोनाच्या काळात तंत्रस्नेही शिक्षकांनी सर्व आव्हानं पेलून परिस्थितीवर मात केल्याची खूप उदाहरणं आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध विषय आकर्षक आणि प्रभावीपणे मांडता येतात, शिकवता येतात, असा अनुभव आहे. गुरुजी आणि गुगल हातात हात घालून जाताना दिसतात. अध्यापन-अध्ययनाला एक नवं परिमाण मिळालं आहे. वॉक (चालणं),

चॉक (खडू) आणि टॉक (बोलणं) याच्या पलीकडे शिक्षक जायला लागला आहे, ही आनंदाची बाब.

या सर्व भूमिकांच्या पलीकडे शिक्षकाचं एक रुप आहे. ते म्हणजे ‘नायक’. मुलं ‘हिरो वर्शिपर्स’ असतात आणि त्यांच्या दृष्टीने पहिला नायक (हिरो) म्हणजे शिक्षक. ही विविध रुपं समजणं आणि साकारण्यासाठी सर्व प्रकारची शक्ती शिक्षकांना द्या, हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना.

- प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :

.