विनेश फोगाटच्या रौप्यपदकावर ऑलिम्पिक संपण्यापूर्वी निर्णय
वृत्तसंस्था/ पॅरिस
निवृत्त झालेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला महिलांच्या 50 किलो वजन गटातील कुस्तीच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवल्यानंतर तिला रौप्य पदक बहाल करायचे की नाही याविषयीचा निर्णय सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक समाप्तीपूर्वी घेतला जाईल, अशी घोषणा क्रीडा लवादाने केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतर फोगाटने गुऊवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. फोगाटने मंगळवारी रात्री उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदकाच्या लढतीत आगेकूच केली होती. सुवर्णपदकासाठी ती अमेरिकेच्या सारा अॅन हिल्डब्रँडशी झुंजणार होती. परंतु बुधवारी वजन मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले.
या अपात्रतेनंतर फोगाटने तिला रौप्यपदक देण्यात यावे यासाठी लवादाला विनंती केली आहे. लवादाने एका निवेदनात म्हटले आहे की, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने घेतलेल्या निर्णयानुसार महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकासाठीच्या सामन्यापूर्वी दुसऱ्या वजन मोजणीत उल्लंघन आढळल्याने सामन्यातून गाळण्याच्या संदर्भात भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने 7 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला होता.
अर्जदाराने सुऊवातीला लवादाने आव्हान दिलेला निर्णय रद्द करावा आणि अंतिम सामन्यापूर्वी आणखी एक वजन मोजणी करण्याचा आदेश द्यावा तसेच तिला अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी पात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तथापि, तिने तत्काळ अंतरिम उपायांची विनंती केली नव्हती. लवादाच्या अस्थायी विभागाची प्रक्रिया जलद आहे, परंतु गुणवत्तेवर आधारित निर्णय एका तासात जारी करणे शक्य नव्हते’, असे लवादाने म्हटले आहे. सदर पक्रिया चालू असून अर्जदाराने निर्णय बदलावा आणि आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक बहाल करण्यात यावे, अशी विनंती केलेली आहे, असेही लवादाने स्पष्ट केले आहे.