प्रेमाचे धडे देणारे विद्यापीठ
रितसर चालतो अभ्यासक्रम
जगात अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्याविषयी आपण कल्पनाही केलेली नसते. मागील 10-20 वर्षांमध्ये लोकांनी अनेक बदल अनुभवले असतील. तंत्रज्ञानापासून शिक्षणाच्या पद्धती आणि अभ्यासक्रमही बदलले आहेत. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आले आहेत. परंतु एक असा अभ्यासक्रम आहे, ज्याबद्दल तुम्ही यापूर्वी ऐकले नसेल.
चीनमध्ये एका विद्यापीठात एक रितसर अभ्यासक्रम चालविला जात असून यात युवतींना प्रेम करणे शिकविले जाते. स्वत:च्या होणाऱ्या पतीचे मन कसे जिंकावे हे या युवतींना शिकविण्यात येते. ईस्ट चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीत हा अजब अभ्यासक्रम सुरू आहे.
या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी 36 तासांचा असून सर्व अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. यात गॉन्ग ली नावाच्या एका संशोधकाने अलिकडेच व्याख्यान दिले आहे. युवती स्वत:ला कशाप्रकारे अधिक आकर्षक करू शकतात हे त्याने सांगितले आहे. योग्यप्रकारे मेकअप कसा करावा, तरुण कसे दिसावे याचे धडे त्याने दिले आहेत.
या क्लासची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. युवतींनी डेटिंगदरम्यान स्वत:ला पारंपारिक दाखवून द्यावे असे गोंग यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर या लेक्चरच्या क्लिप्स व्हायरल झाल्यावर चीनमधील अनेक एनजीओ आणि सामान्य लोकांनी याला चुकीचे ठरविले आहे. हा महिलांच्या सन्मानावर आघात करणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.