99 टक्के हवेद्वारे तयार अनोखी पर्स
वजन केवळ 33 ग्रॅम
तुम्ही अनेक प्रकारच्या पर्स पाहिल्या असतील, काही पर्स चामड्याच्या असतात, तर काही कापडी असतात, परंतु कधी केवळ हवा आणि काचेद्वारे निर्मित पर्सबद्दल ऐकले आहे का? ही अशाप्रकारची जगातील पहिलीच पर्स आहे.
या पर्सचे वजन एका बल्बसमान आहे. ही पर्स पहिल्यांदा पॅरिस फॅशन वीकमध्ये सादर करण्यात आली. या पर्सच्या निर्मितीकरता 99 टक्के हवा आणि एक टक्के काचेचा वापर करण्यात आला आहे. पॅरिसमधील ब्रँड कोपर्नीने पर्स सादर केली आहे. यापूर्वी अमेरिकन मॉडेल बेला हदीदला देखील एअरब्रश सारख्या अनोख्या पद्धतीने निर्मित ड्रेस परिधान करण्यात आला होता. तर याच ब्रँडने नासासोबत मिळून ही एअर स्वाइप बॅग तयार केली आहे. या बॅगचे वजन 33 ग्रॅम असुन ती पूर्णपणे पारदर्शक आहे.
ढगांसारखी दिसणारी ही हँडबॅग स्पेस टेक्नोलॉजी ‘नॅनोमटेरियल सिलिका एरोजेल’द्वारे निर्मित आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट आहे. पृथ्वीवरील सर्वात हलका परंतु ठोस असा हा पदार्थ आहे. नासा याचा वापर स्टारडस्टला पकडण्यासाठी करत असल्याची माहिती कोपर्नी ब्रँडने दिली आहे.
ही पर्स तयार करण्यासाठी ब्रँडने अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सायप्रसचे व्हिज्युअल आर्टिस्ट आणि संशोधक इओनिस मायकलौडिस यांची मदत घेतली आहे. डिझायनर्सनी यात 15 प्रोटोटाइप वापरण्यात आल्याची माहिती दिली आहे. ही पर्स ‘वैज्ञानिक परंतु जादुई’ असलयाचे उद्गार कंपनीचे सहसंस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर सेबेस्टियन मेयर आणि सीईओ अरनॉल्ड वॅलेन्ट यांनी काढले आहेत.