गुजरातमधील अनोखे गाव
कुठल्याच घरात केला जात नाही स्वयंपाक
गुजरातमध्ये देशातील एक अनोखे गाव आहे. या गावातील कुठल्याही घरात स्वयंपाक केला जात नाही. या गावात वृद्धांची संख्या देखील अधिक आहे. पूर्वी या गावात 1100 लोकसंख्या होती. परंतु रोजगाराच्या शोधात लोकांनी गावातून स्थलांतर केले आहे. आता येथे केवळ 500 लोक राहत आहेत. परंतु हे गाव पूर्ण देशासाठी एक अद्भूत उदाहरण ठरले आहे.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात चंदनकी नावाचे गाव आहे. या गावातील कुठल्याही घरात स्वयंपाक केला जात नाही. गावात एक सामूहिक स्वयंपाकघर असून पूर्ण गावासाठी तेथेच अन्न शिजविले जाते. जेवणाच्या निमित्ताने लोक येथे एकत्र येतात आणि परस्परांना भेटतात, गप्पा गोष्टी करतात. या सामूहिक स्वयंपाकघरामुळे वृद्धांमधील एकाकीपणा दूर करण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे.
2000 रुपये मासिक शुल्क
ग्रामस्थांसाठी स्वयंपाक हे आचारी करत असतात. त्यांना दर महिन्याला 11 हजार रुपयांचे वेतन दिले जाते. तर जेवणाच्या बदल्यात ग्रामस्थ दोन हजार रुपयांचे मासिक शुल्क भरत असतात. ग्रामस्थांना वातानुकूलित हॉलमध्ये जेवण वाढले जाते. सामूहिक स्वयंपाकघराच्या निर्मितीत गावाचे सरपंच पूनमभाई पटेल यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आज या गावाचे सामूहिक स्वयंपाकघर पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत आहेत.
जेवणात कशाचा समावेश
सामूहिक स्वयंपाकघराच्या एसी हॉलमध्ये एकाचवेळी 35-40 लोक भोजन करू शकतील अशी व्यवस्था आहे. दुपारच्या भोजनात डाळ, भात, चपाती, भाजी आणि गोडपदार्थ दिला जातो. तर रात्री खिचडी-कढी, भाकरी-भाजी, मेथी गोटा, ढोकळा आणि इडली सांबरची व्यवस्था असते. चंदनकी गावातील सुमारे 300 परिवार अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत.