जर्मनी अन् फ्रान्सदरम्यान अनोखे गाव
जर तुम्ही कधी सीमावर्ती भागात गेला असाल तर दोन देशांदरम्यान तारांचे पुंपण असल्याचे पाहिले असेल. परंतु दोन देशांदरम्यान वसलेल्या एका गावात कुठलेच कुंपण नाही. याचबरोबर रस्ता ओलांडून तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकता. हे गाव जर्मनी आणि फ्रान्सदरम्यान आहे. येथे कुठल्याही प्रकारचे कुंपण नाही. येथे जर्मन लोक केवळ रस्ता ओलांडून फ्रान्समध्ये दाखल होऊ शकतात.
लाइडिंगेन गाव जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमेवर आहे. हे कुंपण नसलेले गाव आहे. येथे दोन्ही देशांचे लोक सर्वसामान्यांप्रमाणे परस्परांना भेटू शकतात. एवढेच नाही तर रस्त्यावर चालण्यादरम्यान रस्त्याचा अर्धा हिस्सा जर्मनीत तर अर्धा हिस्सा फ्रान्समध्ये आहे. येथील लोक परस्परांची मदत करतात आणि त्यांच्या घरीही जातात. आंतरराष्ट्रीय सीमा असूनही येथील लोकांना ही सीमा असल्याचे वाटतच नाही.
परंतु सर्व देशांप्रमाणे येथे संस्कृतीचा फरक आहे. जर्मन लोक स्वत:च्या संस्कृतीचे पालन करतात आणि फ्रान्सचे लोक स्वत:च्या संस्कृती आणि परंपरांचे अनुकरण करतात. एकाच गावात आमने-सामने फ्रान्स आणि जर्मनीचा चर्च आहे. येथील लोक परस्परांशी मिळूनजुळून राहतात आणि मैत्रीही निभावतात. परंतु नियमांनुसार एकमेकांच्या देशात जाणे आणि प्राण्यांना नेण्यावरून काही नियमांचे पालन करावे लागते.
समस्या देखील
आता सीमा असल्याने दोन्ही देशांचे नियम आणि सुरक्षेसाठी तैनात पोलीसही वेगवेगळे आहेत. सर्वसामान्य शहरांप्रमाणे येथेही चोरी होते. परंतु चोरी झाल्यावर सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रान्समध्ये चोरी करून चोर जर्मनीत शिरतो, यामुळे तो कारवाईपासून वाचतो. येथील लोक परस्परांच्या मदतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. या अनोख्या स्थितीनंतरही येथील रहिवाशांना स्वत:च्या गावाबद्दल गर्व आहे.