चीनच्या युवांमध्ये अनोखा ट्रेंड
पक्ष्याचे सोंग धारण करण्याचा प्रकार
चीनच्या युवांनी कामापासून वाचण्यासाठी एक असा उपाय शोधला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. चीनमध्ये लोक पक्षी होण्याचे नाटक करत देशाच्या ‘996’ प्रणालीला विरोध करत आहेत. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील सहा दिवस सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत काम करावे असे या धोरणात म्हटले गेले आहे.
पुरुष आणि महिला ओव्हरसाइज्ड टीशर्ट परिधान करून त्याच्या आत स्वत:चे पाय लपवून फर्निचरवर अशाप्रकारे बसतात की त्यांचे हात पक्ष्यांच्या पायांप्रमाणे दिसून येतील आणि ते एखाद्या पक्ष्याप्रमाणे दिसू लागतील. एवढेच नव्हे तर ते स्वत:चे पंख फडफडविण्याचा आणि तोंडाने चिवचिव असा आवाजही काडत आहेत. चीनच्या अनेक व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सवर अशाप्रकारच्या व्हिडिओंचा महापूरच आला आहे.
पक्षीच का?
पक्षी होण्यामागील विचार दीर्घकाळापर्यंत शिक्षण किंवा काम करण्यापासून मुक्त होण्याशी आहे. या ट्रेंडचे अनुकरण करणारे बहुतांश युजर एक तर विद्यार्थी आहेत जे रॅटरेसमुळे वैतागून गेले आहेत. आणि पदवीधर झाल्यावर नोकऱ्यांच्या स्थितीमुळे घाबरलेले आहेत. 996 संस्कृतीमुळे त्रासलेले हे युवा प्रोफेशनल्स आहेत. हे धोरण त्यांना आठवड्यात 72 तास काम करण्यास भाग पाडते.
तणावापासून मुक्तीची मागणी
युवा काम न करण्याचा विचार व्यक्त करू लागले असते आणि पक्ष्यांप्रमाणे मुक्त विहार करण्याची इच्छा दर्शवत आहेत. यासंबंधीच्या पोस्टला लाखो ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. 9-9-6 पॉलिसी अत्यंत तणाव देणारी आहे. यामुळे आमचे स्वातंत्र्य आणि क्रिएटिव्हीटी संपून जात असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. मी काम करू इच्छित नाही, पक्ष्याप्रमाणे मुक्त राहू इच्छितो असे अन्य एका युजरने म्हटले आहे.
चिनी कार्यसंस्कृती
चीनच्या युवांनी सोशल मीडियावर देशाच्या कार्यसंस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये ‘बाई लॅन’ शब्दाचा व्यापक स्वरुपात वापर सुरू झाला होता. ही संकल्पना एनबीए व्हिडिओ गेमदरम्यान निर्माण झाली होती. ही संकल्पना जाणूनबुजून मॅच हरल्यावर वापरली जात होती. तेव्हापासून चिनी कार्यसंस्कृतीबद्दल वाढत्या असंतोषासाठी याचा वापर केला जाऊ लागला.