राजस्थानातील अनोखे मंदिर
देवाची नव्हे रॉयल एनफील्ड बुलेटची होते पूजा
तुम्ही आतापर्यंत लोकांना देवीदेवतांची पूजा करताना पाहिले असेल, परंतु राजस्थानात एक अशी जागा आहे जेथे लोक देवाची नव्हे तर रॉयल एनफील्ड बुलेटची पूजा करतात. हे मंदिर जोधपूर आणि अहमदाबादला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-62 वर आहे. याला ‘ओम बन्ना मंदिर’ किंवा ‘बुलेट बाबा मंदिर’ म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर पाली शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर चोटिला गावात आहे. येथून जाणारे लोक मंदिरात जातात आणि मगच पुढील प्रवास करतात अशी मान्यता आहे. येथे आशीर्वाद घेतल्यावरच लोक सुरक्षित स्वत:च्या घरी पोहोचत असल्याचे बोलले जाते. या मंदिरात कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. भवनाच्या मधोमध रॉयल एनफील्डची 350 सीसीची एक बुलेट उभी असून याचा नंबर आरएनजे 7773 आहे. ही काही सामान्य बुलेट नसून यामागे पूर्ण कहाणी आहे. लोक सर्वसामान्य मंदिरांप्रमाणेच येथे गाडीवर हार घालतात आणि प्रसाद अर्पण करतात. येथे एक दानपात्र असून ज्यात लोक पैसे टाकतात.
ही बुलेट ओमसिंह राठौड यांची होती, ज्यांचा 1988 मध्ये एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बाइकवरील नियंत्रण गमावल्याने ती एका झाडाला जाऊन आदळली होती. या दुर्घटनेत ओमसिंह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बाइक ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी पोलीस स्थानक परिसरातून ही बुलेट गायब झाली होती. ही बाइक दुर्घटनास्थळी असल्याचे नंतर कळले होते. पोलिसांनी पुन्हा ही बाइक स्थानक परिसरात आणली होती. परंतु नंतर पुन्हा ही बाइक महामार्गाच्या कडेला उभी असल्याचे आढळून आले होते. हा प्रकार अनेक दिवसांपर्यंत घडला होता. यानंतर ओम सिंह यांच्यासोबत जेथे दुर्घटना घडली तेथेच बाइक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक लोकांनी मिळून ओम बन्ना हे मंदिर स्थापन केले होते. मंदिराच्या स्थापनेनंतर महामार्गावर होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण कमी झाल्याचे स्थानिक लोकांचे मानणे आहे.