पृथ्वीच्या गर्भात अनोखा प्रकार
पृथ्वीच्या आत सुमारे 2700 किलोमीटर खाली वाहणारे ठोस खडक प्रत्यक्षात भूगर्भीय चमत्कार आहेत. हे पूर्णपणे द्रव स्वरुपात नसतात, परंतु त्यांचे तापमान अन् दाबामुळे लवचिक होऊन जातात आणि ते अनेक दशके किंवा लाखो वर्षांमध्ये हळूहळू वाहू लागतात, हीच प्रक्रिया पृथ्वीला सजीव ठेवण्यास कारणीभूत असते. म्हणजेच भूकंप, ज्वालामुखी आणि प्लेट्सच्या हालचाली पृथ्वी केवळ पृष्ठभागावर नव्हे तर आतूनही जिवंत असल्याचे सांगतात.
रहस्यांची उकल करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण मानला जाणारा खुलासा आता वैज्ञानिकांनी केला आहे. ईटीएच झ्यूरिचच्या वैज्ञानिकांच्या या संशोधनाच्या केंद्रस्थानी पृथ्वीचे एक रहस्यमय आवरण (डी लेयर) असून ते मेंटल आणि कोरदरम्यान आहे आणि सुमारे 2700 किलोमीटर खोलवर आढळून येते. भूकंपामुळे उठणारे तरंग या आवरणातून जाताना अचानक वेग अन् वर्तन का बदलतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न दशकांपासून केला जात होता.
आता रहस्याची उकल
नव्या संशोधनात वैज्ञानिकांनी कॉम्प्युटर मॉडेल आणि प्रयोगशाळा परीक्षणांद्वारे पोस्ट-पेरोव्स्काइट क्रिस्टल एक निश्चित दिशेत संरेखित (एलाइन) होतात हे सिद्ध केले आहे. जेव्हा हे क्रिस्टल समान दिशेत जोडले जातात, तेव्हा तरंगांना कमी प्रतिरोध होतो आणि ते वेगाने प्रवास करतात. ही सरंचना ठोस खडक पृथ्वीच्या अंतरंगात हळूहळू वाहू लागल्यावरच निर्माण होते.