भारतीय मुलीच्या नावावर अनोखा विक्रम
140 भाषांमध्ये गायिले गाणी
भारताची मुलगी सुचेता सतीशने एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 140 भाषांमध्ये गाणे गाऊन अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. जगात आजवर अशी कामगिरी कुणीच केलेली नाही. याचमुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुचेताचे नाव नोंदले गेले आहे. सोशल मीडियावर सुचेताच्या कामगिरीची व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
केरळची रहिवासी असणाऱ्या सुचेताने 24 नोव्हेंबर रोजी दुबईतील कॉन्सर्ट फॉर क्लायमेटमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान तिने या अनोख्या प्रतिभेचे प्रदर्शन केले होते. सुचेताने विविध भाषांमध्ये गीत गायन केले होते. तर श्रोते तिचा मधूर आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाले होते. सुचेताने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंद झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे. सुचेता सतीशने दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात आयोजित कार्यक्रमात अनोखा विक्रम केला आहे. तिने हवामान बदलाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी 140 भाषांमध्ये गायन करत मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत असे यात नमूद आहे.