महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जगणे शिकवणारे कासव

06:44 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तान्हे बाळ काऊचिऊ, हम्मा, भुभू, मोर, म्याऊ हे सभोवतीचे मर्यादित पशुपक्षी-विश्व बघत मोठे होते. बालकाचा शिक्षणविश्वात प्रवेश झाला की जंगलाशी निगडित लोककथांमधील प्राणीविश्व त्याच्या चिमुकल्या भावविश्वात प्रवेश करते. त्या बोधकथा आयुष्यभर अंगावरील तिळासारख्या मनात, हृदयात कायम असतात. त्यातीलच एक कथा म्हणजे ससा आणि कासव यांची शर्यत. कापसासारखा मऊ, गुबगुबीत, तुरुतुरु पळणारा परंतु अतिशय भित्रा ससा आणि सावकाश चालणारे, अवयव आत ओढून घेणारे टणक दगडासारख्या कडक पाठीचे कासव यांची मैत्री होते हे एक नवलच! लहान मुलांचा कोवळा मेंदू माणसासारखे बोलणाऱ्या-वागणाऱ्या प्राण्यांना सहज आपलेसे करतो. उड्या मारत पुढे पळणारा अहंकारी ससा आणि कमालीबाहेर हळू, मंद मंद चालणारे कासव यांची शर्यत लागते. ध्येयापर्यंत सर्वप्रथम आपणच पोहचणार याची खात्री असलेला ससा अति आत्मविश्वासाने मध्येच झोपून जातो आणि निर्धाराने ध्येय गाठणारे कासव शर्यत जिंकते. शरीराच्या मर्यादा मनाला बांधून ठेवू शकत नाहीत हा संदेश देणारे कासव वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला साथ देत असते. कासव हे जमिनीवर, गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात अर्थात समुद्रात वास करून राहते.

Advertisement

अध्यात्म प्रांतात कासव पदोपदी भेटते. देवळात जाणाऱ्या भक्तांची आणि त्याची रोजच भेट होते. देवापुढे ते पहुडलेले असते. पू. पांडुरंगशास्त्राr आठवले यांनी एक पौराणिक कथा सांगितली आहे. इंद्राने एकदा साक्षात शिवशंकराला स्वर्गात येण्याचे आमंत्रण दिले. शंकर पशुपतिनाथ म्हणून इंद्राने पशूंना त्यांची कला सादर करण्यासाठी रंगमंचावर बोलवले. त्यात बलाढ्या वाघ, सिंह, हत्ती, कोल्हे असे पशू होते. त्यांनी कासवाला ढकलून देण्याचा प्रयत्न केला परंतु कासवाने जिद्दीने शंकराजवळ जाऊन त्यांना नमस्कार करीत आपले कौशल्य दाखवले. हल्ला करणाऱ्या पशूंवर उलटरीत्या आक्रमण न करता कासवाने आपली इंद्रिये आत ओढून घेतली. त्यामुळे शत्रूच्या हल्ल्याचा कासवाच्या पाठीवर काहीही परिणाम झाला नाही. कासवाजवळ अंग आत ओढून घेण्याची शक्ती असल्यामुळे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये कासवाचा दृष्टांत दिला आहे. शक्तिशाली पशूशी न लढता किंवा त्यांची शक्ती कमी ठरवण्याच्या नादात न पडता कासवाने अशी युक्ती केली की शक्तिशाली पशूंची शक्ती स्वत:वर चालणारच नाही. साधकानेही कासवासारखी रक्षणात्मक लढाई करावी. आक्रमक लढाई नको. विषयांचा आघात होतो तेव्हा कासवाप्रमाणे इंद्रिये आत ओढून घेण्याला संयम असे म्हणतात.

Advertisement

संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली ध्यानीमनी परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसलेल्या सत्पुरुषाची अवस्था वर्णन करताना म्हणतात-

का कुर्म जियापरी । उवाईला अवयव पसरी

ना तरी इच्छावशे आवरी । आपुले आपण?

-एखादे कासव जेव्हा स्वस्थ आनंदात असते तेव्हा आपले अवयव पसरते आणि हवे तेव्हा आत आवरून घेते, तसे इंद्रिय आवरण्याचे सामर्थ्य या सत्पुरुषाला येते.

संत तुलसीदासरचित रामचरितमानसमध्ये केवट आख्यान आहे. त्यात केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. हा केवट पूर्वजन्मातले समुद्रातील कासव होता. कासवाला भरपूर आयुष्य असते. जेव्हा या कासवाचे आयुष्य सरत आले तेव्हा त्याला विष्णूंच्या पदकमलाला स्पर्श करून पावन व्हावे असे वाटले. एकादशीला हे कासव विष्णूंच्या जवळ पोहचले. विष्णू क्षीरसागरात शेषावर पहुडले होते. कासव जेव्हा विष्णूंच्या पायापाशी पोहचले तेव्हा तिथे लक्ष्मीमाता पतिरायांची चरणसेवा करीत बसल्या होत्या. कासव जवळ येताच त्यांनी त्याला दूर ढकलले. कासवाने ठरवले की विष्णूंच्या खांद्याकडून पायापाशी उतरावे. परंतु तिथे शेषमहाराज दक्षतेने सेवा करीत होते. शेषाने फणा उगारून कासवाला पाडले. विष्णूंची निद्रा भंग होऊ नये म्हणून कासवाला पुन्हा पुन्हा शेषाने फणा मारून खाली पाडले. यात कासवाचा मृत्यू झाला आणि विष्णूंच्या चरणस्पर्शाची त्याची इच्छा अपुरी राहिली. पुढे हा जलचर प्राणी त्रेतायुगात केवट बनला. त्याला त्याचा पूर्वजन्म स्पष्ट आठवत होता. आता विष्णूंनी श्रीरामांचा अवतार घेतला आणि लक्ष्मीमाता सीतामातोश्री झाल्या. शेष भगवान लक्ष्मण झाले. केवटाने या जन्मात श्रीरामांच्या दोन्ही चरणांना मनसोक्त जलाभिषेक करून पारणे फेडले. श्रीरामही कौतुकाने हसले. सीतामाता आणि लक्ष्मण यांना बाजूला ठेवून त्याने एकट्याने श्रीरामांचे चरणामृत प्राशन केले. आदरणीय श्री गोविंददेवगिरी म्हणतात, ‘भगवद् विषयक केलेला आपला संकल्प जर प्रबळ असेल तर तो संकल्प पूर्ण करण्याचे दायित्व भगवंताचे असते. म्हणून मनामध्ये नेहमी शुभ संकल्प करीत चला.’

भगवंतांचे जे दशावतार आहेत त्यात दुसरा अवतार हा कासवाच्या रूपाचा आहे. समुद्रमंथनाशी याचा संबंध जोडला आहे. समुद्रमंथनाच्यावेळी मंदर पर्वताची रवी करून त्याला वासुकी नावाची दोरी बांधून मंथन सुरू झाले. परंतु पर्वताला खाली काही आधार नसल्यामुळे तो समुद्रात बुडू लागला तेव्हा भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले आणि पर्वताला खाली आधार दिला. कवी जयदेव आपल्या अष्टपदीमध्ये म्हणतात, ‘हे जगदीश हरे, तुझ्या विस्तृत पृष्ठभागावर पृथ्वी उभी आहे. या पृथ्वीला धारण केल्याने तुझ्या पाठीवर चक्र तयार झाले आहे. हे कच्छप रूप धारण करणाऱ्या केशवा, तुझा जयजयकार असो.’

देवळाच्या सभामंडपात जी कासवाच्या आकाराची शिला बसवतात तिला कूर्मशिला असे म्हणतात. विष्णूने कूर्मरूप धारण करून पाठीवर मंदराचल उभा ठेवला आणि त्याला खचू दिले नाही. प्राचीन वास्तूशास्त्रज्ञांनी हे लक्षात ठेवून देवळात कूर्मशिला बसवली. आपण उभारलेले मंदिर खचू नये, कुर्माने ते उभे, चिरंजीव, अभंग ठेवावे ही त्यामागे भावना व प्रार्थना आहे.

कासवीचा दृष्टांत असा आहे की कासवी आपल्या दृष्टीने पिल्लांचा सांभाळ करते. सद्गुरूंचीही तशीच आपल्या शिष्यांवर कुर्मदृष्टी असते. कासवीला जर पिल्लांचे विस्मरण झाले तर तिची बाळे पंचत्व पावतात. जलाशयातले, समुद्रामधले कासव आपल्या पूर्वजांनी माणसाच्या रोजच्या जगण्यात आणून ठेवले. कारण निसर्गसाखळीतील कासव दीर्घकाळ जगले पाहिजे. ते पर्यावरणपूरक आहे. म्हणून आपणही पर्यावरणस्नेही व्हायला हवे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article