बंदीवासातील वृक्ष
पाकिस्तानातील पेशावर येथे एका वृक्षाला बंदीवासात डांबण्यात आले आहे. ज्याप्रमाणे कारागृहातील बंदीवानांना बाहेर नेण्याच्या वेळी त्यांच्या हातात बेड्या घालण्यात येतात, तशाच प्रकारच्या बेड्या या वृक्षाला घालण्यात आल्या आहेत. या झाडाची ही स्थिती गेल्या दोन-पाच वर्षांमधील नाही. तर तब्बल गेल्या 125 वर्षांपासून ते याच स्थिती असल्याचे सांगितले जाते. चोवीस तास या वृक्षाला साखळ्यांनी जखडून ठेवण्यात येते. आता या झाडाची नेमकी चूक काय की जिच्यामुळे त्याची अवस्था करण्यात आली आहे, हा खरा प्रश्न आहे.
या वृक्षाच्या बंदीवासाचे कारण आहे, एक ब्रिटीश अधिकारी. जेम्स स्क्विड असे त्याचे नाव होते. त्याने एकदा मद्याच्या नशेत या झाडालाच बेड्या ठोकल्या. हा अधिकारी पेशावरच्या कोताल नावाच्या वस्तीत नियुक्त करण्यात आला होता. तो मद्यपी होता. एकदा मद्याच्या नशेत धुंद होऊन तो निघाला असताना वाटेत त्याला हा वृक्ष दिसला. तो आपल्यापासून दूर पळत आहे, असे त्याला त्याच्या नशेत वाटले. त्यामुळे त्याने त्याला साखळदंडांनी जखडण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे त्वरित क्रियान्वयनही केले. ही घटना 125 वर्षांच्या पूर्वीची आहे.
तेव्हापासून आजवर हा वृक्ष अशाच स्थितीत आहे. खरे तर त्याची काहीच चूक नाही. वृक्षाची काय चूक असू शकते ? पण एका मद्यधुंद अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे त्याला ही शिक्षा भोगावी लागत आहे. आज या घटनेला सव्वाशे वर्षे झाली. पण कोणीही त्याची सुटका करण्यास पुढे येत नाही. पाकिस्तानात असे गमतीने म्हटले जाते, की गेली 125 वर्षे या देशाला अशी नशेत असणारीच सरकारे मिळाली आहेत. मग त्या वृक्षाची सुटका करणार तरी कोण ?