For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परतत्वाला स्पर्श... चित्रकला

06:33 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
परतत्वाला स्पर्श    चित्रकला
Advertisement

एकदा एका वर्गातल्या मुलांना समुद्रकाठी नेऊन तिथल्या दृश्याचे वर्णन शब्दात, चित्रात, शिल्पात ज्याला जे शक्य असेल तसं करायला सांगितलं. बऱ्याच मुलांनी चित्र काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी वाळूवर रेघोट्या मारून पाहिल्या. काही कवींनी शब्दात पकडण्याचा स्पर्श केला परंतु एका चित्रकाराने त्याचं असं काही चित्र रेखाटलं की पाण्याने सूर्याला स्पर्श केलाय असे भाव त्यातून व्यक्त होत होते. म्हणजेच परतत्वाला स्पर्श करणारे चित्र आपल्या हृदयाला भिडतं. चित्र आपल्याशी बोलतं. चित्र आपल्याला काहीतरी सांगत असतं. आपल्याला जे दिसतं त्याच्या पलीकडचं ते दाखवत असतं. त्याचा व्यक्तिगत अनुभव तो त्या भावातून व्यक्त करत असतो. म्हणजेच तो आपल्याला साक्षात परमेश्वराला भेटवत असतो. चित्राला परिमाणे दोनच लांबी आणि रुंदी. तरीही साऱ्या जगाला व्यापून राहतं किंवा साऱ्या जगाची भाषा बनतं ते चित्र. जगातल्या अनेक भाषा अशाच चित्रशैलीतूनच आपल्यापर्यंत पोहोचतात आणि शब्दांशिवाय आपल्यापर्यंत संदेश पोहोचवतात. चित्रकला रेषांना बोलकं करते. उभी रेषा स्थिरता, समर्थता दाखवते तर आडवी रेषा शांतता विश्रांती दाखवते. तुटकरेषा चंचलता गुंफण, गुंतागुंत किंवा गोंधळ दाखवते तर वक्ररेषा सौंदर्य, तोल, नाजूकता आपल्यासमोर आणते. छेद रेषा विरोध संकट निषेध दाखवते म्हणजेच अस्थिरता गती सुचित करत असते. चित्रातल्या भूमितीचा प्रत्येक आकार हा अर्थपूर्ण असतो. चित्रातले रंगदेखील बोलके असतात. ते चित्राचं अंतरंग उलगडत असतात आणि आपल्या भावजीवनाचे प्रतीक ठरवत असतात. तांबडा रंग शौर्य, तीव्रता, उष्णता, क्रोध, सूड अशा भावना व्यक्त करत असतो. पिवळा रंग तेज ऐश्वर्यसंपन्नता उल्हास दाखवतो. निळा रंग शांतता, भव्यता, विश्वास आणि विचारशीलता दाखवतो. हिरवा रंग समृद्धी आणि मांगल्य दाखवतो, थंडावा देतो याच रंगरेषा नृत्य नाट्यातसुद्धा दिसतात. वीस- पंचवीस हजार वर्षांपूर्वी चित्रे रेखाटली गेली आहेत. गुहांमधून भीम बेटकासारख्या भोपाळजवळ मध्य प्रदेशच्या मंदिरातून ही चित्रकला दिसते. या गावांमध्ये पहाडीगुहा आहेत आणि या गुहांमध्ये ही प्राचीन चित्रे रंगवलेली दिसतात. प्राग ऐतिहासिक काळातील ऋग्वेदात चित्रकलेचा उल्लेख आहे. संस्कृत साहित्यात, बौद्ध साहित्यात सुद्धा चित्रकलेचा उल्लेख दिसून येतो. खरंतर चित्रकलेला आमच्या संस्कृतीमध्ये फार मोठे स्थान आहे. पूर्वी भित्तीचित्रे घरांमध्ये आवर्जून असायची. अशी भित्तीचित्रे आज आम्हाला वाईमध्ये पाहायला मिळतात. पूर्वी अंगणात रांगोळ्या काढल्या जायच्या. जेवणाच्या ताटाभोवती रांगोळ्या असायच्या, या सगळ्यातून कलाकारांच्या मनाची प्रसन्नता आपल्याला जाणवत असते. फार पूर्वी आदिवासी लोक या चित्रकलेसाठी प्रसिद्ध होतेच. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे वारली पेंटिंग. आमच्या दाराच्या चौकटीसुद्धा त्याकाळी रंगवलेल्या असायच्या. झोपड्या, अंगण, घरातले माठ, पातेली जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे चित्रकलेला वाव मिळायचा. लहान मुलं कुठेही चित्र काढायला लागतात ना, त्याचंच हे एक प्रतीक. त्याच्याही आधी आदिवासी लोक शरीरावर गोंदवून घेत जी कला आजकाल टॅटूच्या रूपात पुन्हा आपल्यासमोर आली आहे. हे सगळे चित्रकलेचाच वारसा सांभाळणारे घटक. आमच्या जीवनाचा समृद्ध वारसा असणारी चित्रकला सर्वत्र पाहायला मिळते.

Advertisement

Advertisement
Tags :

.