बेंगळूर बुल्सचा थरारक विजय
अजिंक्य, अक्षित चमकले : तामिळ थलैवाज पराभूत
वृत्तसंस्था/ हैदराबाद (तेलंगणा)
2024 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या थरारक सामन्यात बेंगळूर बुल्सने तामिळ थलैवाजचा 36-32 अशा 4 गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील बेंगळूर बुल्सचा हा दुसरा विजय आहे.
बेंगळूर बुल्स संघातील अजिंक्य पवार, अक्षित आणि सुरिंदर देहाल यांची कामगिरी दर्जेदार झाली. या तीन कबड्डी पटूंनी प्रत्येकी 5 गडी बाद केले. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक चढायांवर अधिक भर दिला. जय भगवानने बेंगळूर बुल्सला आपल्या चढायांवर 2 गुण मिळवून दिले. त्यानंतर तामिळ थलैवाजचा कर्णधार साहिल गुलियाने चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या टाईमआऊट अखेर दोन्ही संघ 7-7 असे बरोबरीत होते. नितीन रावलने आपल्या चढायांवर तामिळ थलैवाजला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांच्या बचावफळी भक्कम असल्याने आक्रमण करणाऱ्या रायडर्सना अधिक गुण मिळू शकले नाहीत. त्यामुळे मध्यंतरावेळी बेंगळूर बुल्सने तामिळ थलैवाजवर 14-13 अशा केवळ एका गुणाची आघाडी मिळवली होती.
सामन्याच्या उत्तरार्धात तामिळ थलैवाजच्या सचिन तनवरने आपल्या संघाला गुण मिळवून दिले. त्यानंतर तामिळ थलैवाजने बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद करुन आघाडी घेतली. पण त्यांना ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. बेंगळूर बुल्सने आपल्या डावपेचात बदल करत पुन्हा हा सामना 23-23 असा बरोबरीत ठेवला. तामिळ थलैवाजच्या अनुज गावडेने अजिंक्य पवारची पकड केल्याने तामिळ थलैवाजला 2 गुणांची आघाडी मिळाली.
सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना अक्षितने काही महत्त्वाच्या चढायांवर तामिळ थलैवाजचे सर्व गडी बाद केल्याने बेंगळूर बुल्सने 3 गुणांची आघाडी मिळवली. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना तामिळ थलैवाजने आक्रमक चढाया केल्या पण त्यांना गुण मिळाले नाहीत. सुरिंदर देहालने आपल्या चढायांवर सुपर 5 गुण मिळवित बेंगळूर बुल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बेंगळूर बुल्सला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती.