तीस रुपयाची पुडी, आयुष्य बरबाद करी
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
शरीरातील काही बदलामुळे कॅन्सर होतो, हे खरे आहे. पण कोल्हापुरात फक्त 30 रुपयात कॅन्सर होऊ शकतो आणि कॅन्सर बरे होण्याचे नव्हे तर कॅन्सर होण्याचे हे मिश्रण कोल्हापुरात अवघ्या तीस रुपयांत सहज मिळत आहे. कोल्हापुरातल्या युवकांना त्याची चटकच लागली आहे. चिमूटभर मिश्रण तोंडात दाढेखाली धरल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही, अशी परिस्थिती आहे. तीस रुपयांची ही साध्या कागदात बांधलेली पुडी कोल्हापुरातील काही प्रमुख चौकांत अगदी सहज मिळते आहे. अनेक तरुणांच्या पुऱ्या आयुष्याची बरबादी त्या पुडीतून होत आहे. पूर्णपणे बेकायदा असलेला हा व्यवसाय शहरापासून उपनगरांपर्यंत काना-कोपऱ्यात दडून नव्हे, उघड सुरू आहे. आणि गांजासारख्याच या नशिल्या व्यसनाने तरुणाईत चांगलेच मूळ धरले आहे.
कोल्हापुरातली तरुण पिढी बरबाद करण्याचा हा प्रकार छोट्या-छोट्या टपऱ्यांतून चालू आहे. हा प्रकार जगाच्या नजरेसमोर येऊ नये म्हणून पडदे लावून दर्शनी भाग दडवला जात आहे. पण चोराच्या वाटा चोरालाच माहिती, या पद्धतीने ही माव्याची विक्री उघड सुरू आहे. सुपारी, बंदी असलेला सुगंधी तंबाखू, चुना, कात व हे मिश्रण अधिक कडक व्हावे म्हणून इतर रसायने वापरून हा मावा मळला जात आहे. चिवा बाजाराजवळ तर हा मावा मळण्याचे काम करण्यासाठी 7 ते 8 मजूरच नेमले आहेत. जणू काही हा माव्याचा छोटा कारखानाचा आहे.
अशा मावा सेंटरची भवानी सकाळी सात वाजल्यापासूनच सुरू होते. गाडीवरून कामावर जाणारे तेथे थांबतात. पुडी घेतात, चिमूटभर मावा डाव्या किंवा उजव्या दाढेखाली ठेवतात. गाडीला किक मारली जाते आणि बघता-बघता माव्याची किकही त्यांना चढते आणि ती किक दिवसभर रहावी म्हणून माव्याची चिमुट थोड्या-थोड्या-थोड्या वेळाने दाढेखाली धरावीच लागते. मग एका पुडीत भागत नाही म्हणून तीन-तीन पुड्यांसाठी पैशाची जोडणी करावी लागते. थेट मेंदूला बधिर करणारा हा मावा मेंदूपुरता राहत नाही. त्याच्यातले घातक पदार्थ दाढेखाली सतत धरून ठेवल्याने कर्करोगाला आयती संधीच मिळते. मग हळूहळू दाढेजवळची जागा बधिर होते. जिभेची संवेदना कमी होते. तोंडाला तिखट सहन होत नाही. तोंड उघडण्यावर मर्यादा येतात. जांभई देण्यासाठीही तोंड पूर्ण उघडता येत नाही. जिभेवर गालाच्या आतल्या भागात चट्टे उठतात, जखमा होतात आणि अशा 100 पैकी 90 जणांना कर्करोगाचे निदान होते आणि तिथूनच आयुष्याचे काउंटडाऊन सुरू होते. दवाखान्याच्या खर्चाने कुटुंबाची वाताहात होते. 30 रुपयाची एक माव्याची पुडी होते नव्हते ते सारे उद्ध्वस्त करून जाते.
असला मावा खाऊ नये, आपली काळजी ज्याचे ज्याची त्याने घ्यावी, हे म्हणायला ठीक आहे. पण ही बेकायदेशीर विक्री थांबणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. माव्याचे व्यसन लागण्यास उघड मिळणारा मावा हे मुख्य कारण आहे. त्यामुळे कठोर कारवाईचीच गरज आहे. अन्न व औषध प्रशासन पोलिसांची एलसीबी, डीबी यांनी नजर ठेवायची म्हटलं तर एकही माव्याचा अड्डा कोल्हापुरात चालू शकणार नाही, एवढी पोलिसांची नक्कीच ताकद आहे. पण तसे होत नाही, अशी परिस्थिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी थोडे जरी लक्ष घातले तरी ही मावा विक्री थांबणार आहे आणि युवकांना कर्करोगाच्या धोक्यापासून रोखता येणार आहे. याशिवाय अनेक कुटुंबांची होणारी वाताहातही थांबणार आहे.