महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शितावरून भाताची परीक्षा

06:37 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या रविवारी या निवडणुकांचे निकाल लागतील. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा ही तशी सर्व मोठी राज्ये आहेत आणि पूर्वोत्तर प्रदेशातील मिझोराम. यातील चार राज्ये ही महत्त्वाची आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकणारी आहेत. लोकसभा निवडणुकांना मार्चपासून प्रारंभ होईल. मे महिन्यात निकाल लागतील. सत्ताधारी भाजपची खऱ्या अर्थाने कसोटी आहे. 17 कोटी जनतेने नेमका कोणता कौल या पाच राज्यांतील निवडणुकीतून दिलेला आहे, हे कळत नाही परंतु ‘एक्झिट पोल’ने गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केल्यानुसार मध्य प्रदेश भाजपच्या बाजूने राहील. राजस्थान हे देखील भाजपच्या बाजूने जाईल. तेलंगणा आणि छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसकडे जातील. तेलंगणा प्रथमच काँग्रेसची लाट आल्याप्रमाणे जिंकून जाईल. असा अंदाज वर्तवलाय. या देशात दोनच मोठे राजकीय पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस. या दोन पक्षांच्या भोवतीच सत्तेची गाडी फिरत आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांतील निवडणूकांकडे पाहिले जाते. त्यामुळेच या निवडणूका महत्त्वपूर्ण ठरत आहेत. राजस्थानमध्ये पाच वर्षांनंतर भाजपला पुन्हा सत्ता प्राप्त होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश भाजपच्या हातून निसटून काँग्रेसच्या हाती लागले. छत्तीसगडमध्ये देखील अशीच स्थिती झाली होती व तेलंगणाकडे तर भाजपने कधी गांभिर्याने पाहिले नाही. तेलंगणामध्ये बी.आर.एस.ला प्रथमच जबरदस्त धक्का बसणार आहे. काँग्रेस पक्ष तिथे मुसंडी मारणार, हे नक्की. राहुल गांधींच्या हैद्राबाद येथील पहिल्याच सभेला जे आठ लाख लोक जमले त्याचवेळी खऱ्या अर्थाने पाल चुकचुकली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री राव व त्यांचे सारे कुटुंबच सरकार चालवित होते. जनता त्यांच्या कारभाराला विटली होती मात्र ज्या पद्धतीने भाजपने तेलंगणामध्ये काम करणे आवश्यक होते, ते काम त्यांनी केले नाही. त्यामुळे भाजपने जरी सारी ताकद पणाला लावली असली तरी हा पक्ष फार मागे पडला. मुळात दक्षिण भारतात भाजपला कुठेही संधी प्राप्त होत नाही. भाजपने पश्चिम आणि पूर्व तसेच उत्तर भारतात आपली घडी नीट बसविलेली आहे. या पाच राज्यांतील निवडणूका म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपमधील सर्वांत मोठे नेते असलेल्या पक्षाला जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे  पडसाद आगामी लोकसभा निवडणुकीत उमटण्याचीच शक्यता जास्त. ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपकडे दोन मोठी राज्ये येतात. ही सत्ता पक्षासाठी जमेची बाजू ठरते. पुढील तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केली होती. म्हणजेच ज्या जनतेने राज्य पातळीवर भाजपला बाजूला काढले त्याच जनतेने लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपसाठी घसघशीत मतदान केले, हे कसे विसरून चालेल? पाच राज्यातील या निवडणुकीत भाजप सर्व शक्तीनिशी उतरलेली आहे. तर काँग्रेसने ‘करेंगे या मरेंगे’ या तत्त्वावर या निवडणूका लढविल्या आहेत. तेलंगणाची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत विधानसभेच्या दोन वेळा निवडणूका झाल्या. दोन्हीवेळा के. चंद्रशेखर राव यांच्या बी.आर.एस. पक्षाने जिंकलेल्या आहेत. मात्र आता तुमची आणखी दादागिरी नको, हे सांगण्यासाठी तर काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला नसेल ना! मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तीव्र संघर्ष आहे. कोणीही जो जिंकून येईल, तो काठावर राहील. भाजपवालेच चांगल्या मतांनी मध्य प्रदेशवर आपला झेंडा फडकविण्याचीच शक्यता आहे. पाचपैकी चार राज्यांचा विचार करता छत्तीसगडमध्ये काँग्रेसला जनतेने पुन्हा एकदा संधी देण्याचे ठरविलेले असावे. जनता फार हुशार आहे, हे संभाव्य निवडणूक निकाल लक्षात घेता कळून चुकते. सत्ताधारी भाजपही हवा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसही हवा, असाच जनता संदेश देत असावी. लोकसभा निवडणूका जवळ येत आहेत आणि तत्पूर्वी पाच राज्यांतील निवडणूका जनतेला या देशाला, सत्ताधारी भाजपला आणि विरोधात असलेला काँग्रेस पक्ष यांच्यासाठी एक उत्तम धडा आहे. सत्ताधारी भाजपला या निवडणूका प्रतिष्ठेच्या वाटत होत्या तर काँग्रेसकरीता जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गेल्या लोकसभेच्या दोन निवडणूकांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्लेला होता. यावेळी काँग्रेसच्या परिस्थितीत सुधारणा होणार का? की, ‘इंडिया’ नावाच्या त्यांच्या आघाडीला प्रतिसाद मिळेल का? हे पाहणे आवश्यक आहे. पाच राज्यांतील निवडणूका व त्यांचे निकाल म्हणजेच ‘शितावरून भाताची परीक्षा’ घेण्याचाच हा प्रकार होता व आहे. देशातील जनतेचा कौल नेमका कोणत्या बाजूला आहे, हे पाहणे तेवढेच आवश्यक होते. इ.स. 2018 मध्ये याच राज्यांतील निवडणूक निकालांचे ‘एक्झिट पोल’ फोल ठरले होते. यावेळी देखील ते फोल ठरतील का? अशी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असणार परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात येतील. दोन्ही राज्यांमध्ये मागील निवडणुकीत काँग्रेसला कौल मिळाला होता. मध्य प्रदेशमध्ये मागाहून काँग्रेस पक्षात फूट पडली व आमदार भाजपमध्ये गेले व मध्य प्रदेश पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात गेले. सध्या ‘एक्झिट पोल’चा कौल पाहता मध्य प्रदेशमध्ये भाजप व काँग्रेसला समसमान संधी, अशी मते काही वृत्तवाहिन्या व्यक्त करतात तर काहींनी भाजपला पूर्ण ताकदीचे सरकार स्थापन करण्यास जनतेने कौल दिलेला आहे, असे दाखविलेले आहे. रविवारी एक्झिट पोलचा पोलखोल होणारच आहे. मात्र या पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालाने जनतेच्या मनात नेमके काय दडलेय याचा अंदाज आपल्याला घेता येईल परंतु देशातील दोन्ही राजकीय पक्षांसाठी या निवडणूका हा एक चांगला धडा ठरणार आहे. ‘सत्तेने जास्त उतू नका व मातू नका आणि दिलेला वसा सोडू नका’, असाच सल्ला जनता सत्ताधारी पक्षांना देणार आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी के. चंद्रशेखर राव यांचे अख्खे कुटुंबच राजकारणात रंगलेय आणि त्याचा जनतेला फार त्रास व मनस्ताप सहन करावा लागत होता. आता तशी परिस्थिती राहणार नाही. काँग्रेस पक्ष तेलंगणात भरघोस मतांनी निवडून येईल, असेच एक्झिट पोलमधून दिसते आहे. यातून के. चंद्रशेखर राव यांचे पंतप्रधान बनण्याचे जे उद्दिष्ट होते, ते रसातळाला जाईल. त्यांनी काही राजकीय नेत्यांना धरून काँग्रेस व भाजपला बाजूला ठेवून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न आता अयशस्वी ठरणार आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा सत्तेचा माज उतरविण्यासाठी तिथे जनताच हवी. त्यानुसार आता जनतेने कौल दिलेला आहे. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होताच आपण जे मनात म्हणतो, एक्झिट पोल पाहतो, ते खरोखरच सत्यात उतरलेत का? हे समजेल. ‘हातच्या काकणाला आरसा कशाला’ हवा? केवळ एका दिवसाचा तर प्रश्न आहे. लोकसभेत पुन्हा मुसंडी मारून येण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न राहील परंतु राजस्थान हातून गेले व मध्य प्रदेश येत नाही, हे पाहून काँग्रेसचे अवसान तर गळणार नाही ना! ‘इंडिया’ आघाडीचे तीन तेरा वाजताहेत. त्याला हे राजकीय पक्षच जबाबदार आहेत व काँग्रेस त्याला जास्त जबाबदार आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article