Sangli News : सांगलीत मोबाईल शॉपीला भीषण आग!
सांगली पोलिसांनी घटनास्थळी नोंद
सांगली : शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या आझाद चौकातील शिव मेरिडियन या व्यापारी संकुलातील अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या शॉपीच्या पोट माळ्यावर ही प्रथम आग लागली. त्यानंतर आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, लाखोंचे एलईडी स्क्रीन असे अंदाजे ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ या ठिकाणी धाव घेतली यंत्रणा कार्यान्वित करत एका तासातच आग आटोक्यात आणली. ही आग इन्व्हर्टर शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ही आग लागलेली समजताच - येथील वॉचमन नाझिर मुलाणी यांनी मालक रवी केंपवाडे यांना माहिती दिली. रवी यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. स्टेशन चौक आणि टिंबर एरिया येथून दोन गाड्या आल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे ही आग आटोक्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, शिव मेरिडियन संकुलात अनेक मोबाइल व अॅक्सेसरिज विक्रीची दुकाने, हॉटेल, फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत.
याच इमारतीत वीरेंद्र यड्रावे यांच्या मालकीचे अण्णाज नवतरंग मोबाइल शॉपी नावाने मोबाइलचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक दुकानाच्या पोट मजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. मालकांनी दुकानच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडला. त्यातून आत जाऊन महापालिकेच्या अग्निशमनच्या जवानांनी पाण्याचा फवारा सुरु केला. अ ग्नशमन विभागाचे प्रमुख सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, उमेश सरवदे, देविदास मानकरी, विजय कांबळे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
तासिमराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली होती. या आगीत दुकानाच्या पहिल्या मजल्यावर रेडमी कंपनीचे १२० मोबाइल, चार संगणक, लॅपटॉप, तसेच मोठे स्क्रीन,सोफा अशा अनेक महागड्या वस्तू आगीच्या भक्ष्य झाल्या. ही आग याच दुकानात आटोक्यात आली म्हणून बरं झाले. त्याच्या बरोबर वर हॉटेल आहे त्याच्या सर्व रूम मध्ये लोक राहिले होते. त्याना तात्काळबाहेर काढण्यात आले. तसेच ही आग आजूबाजूला पसरू नये याचीही काळजी घेण्यात आली होती. रात्री उशिरा पर्यंत या आगीत झालेल्या नुकसानीबाबत नवतरंग शॉपीचे मालक आणि कर्मचारी मेळ घालत होते. सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.