ब्रिटनमधून येतेय 40 इंजिनियर्सची टीम
14 दिवसांपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर उभे एफ-35 :
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
ब्रिटनच्या नौदलाचे सर्वात आधुनिक स्टील्थ लढाऊ विमान एफ-35 ‘तांत्रिक बिघाडा’मुळे केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर 14 दिवसांपासून उभे आहे. 9500 कोटी रुपयांच्या या विमानातील बिघाड ब्रिटनच्या इंजिनियर्सना अद्याप दूर करता आलेला नाही. याचदरम्यान केरळमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने अडथळे निर्माण झाले आहे. तरीही या लढाऊ विमानाच्या सामरिक महत्त्वामुळे सीआयएसएफचे जवान 24 तास याची देखरेख करत आहेत.
या लढाऊ विमानाचे उड्डाण करविण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु सर्व व्यर्थ ठरले आहेत. आता रॉयल ब्रिटिश नेव्ही या विमानाचे उड्डाण करविण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे विमान 14 जूनपासून कथित स्वरुपात हायड्रोलिक बिघाडामुळे उड्डाण करू शकत नव्हते. याचदरम्यान लढाऊ विमानाची दुरुस्ती भारतातच केली जाणार असल्याचे समजते. या विमानाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटनमधून एक टो वाहन भारतात पोहोचणार आहे. तसेच ब्रिटिश इंजिनियर्स आणि तज्ञांचे 40 सदस्यीय पथकही केरळमध्ये दाखल होणार आहे. तर निश्चित कालावधीपेक्षा अधिक काळ उभे राहिल्याने एफ-35 ला विमानतळाचे पार्किंग शुल्क भरावे लागणार आहे.
14 जून रोजी रॉयल ब्रिटिश नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रूपचा हिस्सा असलेल्या एफ-35बी लाइटनिंग द्वितीयने कमी इंधनामुळे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले होते. खराब हवामानामुळे हे विमान विमानवाहू युद्धनौकेवर परतू शकले नव्हते. ही विमानवाहू युद्धनोका केरळच्या किनाऱ्यापासून 100 सागरी मैल अंतरावर आहे.
ब्रिटनचे पथक रवाना
टो वाहनाने युक्त ब्रिटनच्या तज्ञांची 40 सदस्यीय टीम तिरुअनंतपुरम येथे पोहोचणार आहे. ही टीम एअर इंडियाच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) हँगरमध्ये या लढाऊ विमानाची दुरुस्ती करणार आहे. ब्रिटनची इंजिनियरिंग टीम पोहोचल्यावर विमानाला दुरुस्तीसाठी हँगरमध्ये नेण्यात येणार असल्याचे ब्रिटनच्या उच्चायोगाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या विमानाचा वैमानिक प्रथम या विमानाला हँगरमध्ये नेण्यास अनिच्छा व्यक्त करत होता, याकरता वैमानिक कुठलेही कारण सांगत नव्हता. परंतु हँगरमध्ये गेल्याने विमानाचा तांत्रिक तपशील भारताच्या इंजिनियर्सना मिळू शकतो अशी भीती ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना सतावत होती असे समजते. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एफ-35बी लवकर दुरुस्त करण्यासाठी ब्रिटन काम करत आहे. निरंतर सहकार्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो असे ब्रिटनच्या उच्चायोगाच्या प्रवक्त्याने म्हटले हेते.