बिबट्याच्या शोधासाठी नागेनहट्टी-यरमाळमध्ये पथक दाखल
वनविभागाकडून ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम
प्रतिनिधी/ बेळगाव
नागेनहट्टी-यरमाळ शिवारामध्ये बिबट्याची हालचाल जाणवल्याने वनविभागाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारनंतर वनविभागाचे एक पथक या भागात दाखल झाले आणि त्यांनी पायांचे ठसे, तसेच ज्या ठिकाणाहून बिबट्याचे छायाचित्र काढले होते त्या परिसराची पाहणी केली.
नागेनहट्टी व यरमाळ शिवारांमधील मध्यभागी सोमवारपासून बिबट्याची हालचाल दिसली. गवत कापण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना बिबट्याची हालचाल दिसताच त्यांनी मोबाईलवरून छायाचित्रण केले. इतर शेतकऱ्यांनाही सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळीही बिबट्याने दर्शन दिले. यामुळे यरमाळ, नागेनहट्टी, नंदिहळ्ळी या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी तक्रार करताच वनविभागाने या परिसराची पाहणी केली. ज्या शेतकऱ्याला सर्वप्रथम बिबट्या दिसला त्याच्याकडून अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. पुढील दोन दिवस शोधमोहीम राबविली जाणार असून त्यानंतर सापळा लावायचा की नाही? यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे वनविभागाने स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले. ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुधवारी सकाळीही वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी या परिसरात शोध घेत होते.