For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुंभारासारखा गुरु...

06:33 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुंभारासारखा गुरु
Advertisement

कुंभारासारखा गुरु नाही रे जगात

Advertisement

वर घालितो धपाटा आत आधाराचा हात.

कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ

Advertisement

देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट

घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात

विरोधाभासातून चमत्कृती किंवा गंमत निर्माण करणे हे आधुनिक वाल्मिकी म्हणवल्या जाणाऱ्या ग. दि. माडगूळकरांच्या लेखणीचं वैशिष्ट्याच आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या गाण्यात मिळेल. खरंतर हे गाणं खूप जुनं आहे. याचं संगीत गजाननराव वाटवे यांचं आहे जे खूपच जुन्या पिढीतले संगीतकार! आणि स्वर आहेत अनुराधा मराठे यांचे. गुरु किंवा शिक्षक यांच्या सहवासात आपण दिवसाचे बरेच तास राहत असतो. खरं म्हणाल तर गुरु हा आपल्याला कुठल्याही वळणावर कधीही भेटू शकतो. पण माणूस त्याच्या वयातल्या संवेदनशील काळात त्याला भेटलेल्या प्रत्येक गुरूंची आठवण ठेवतो.

बऱ्याचदा चांगल्यासाठी आणि काही वेळेला कटुतेसाठीसुद्धा! कारण जगातलं सगळ्यात कडू काम त्यांना पार पाडावं लागतं. तसं ते आई-वडिलांनाही पार पाडावं लागतं. पण मातृदेवो भव पितृदेवो भव नंतर आचार्यदेवो भव! म्हणजेच आपल्या गुरुजींवर ते काम येतं. लहान वयात न कळत जाणता अजाणता आपल्या हातून असंख्य चुका घडत असतात. काही चुका पुन्हा पुन्हा घडत जातात. त्या चुकांचा परिणाम काय होतो हे समजावलं नाही तर माणूस वाममार्गाला लागण्याची भीती असते. आणि म्हणून अशावेळी गुरूंना कठोर व्हावं लागतं. आणि हे सगळं काही एका ओळीत बोलून गेलेत गदिमा आणि हे काम खरंच कठीण असतं. त्याचं कारण असं की मुलाच्या चुकीबद्दल त्याला फटके देताना त्याच्या पाठीशी आधाराचा हातही ठाम धरावा लागतो.

प्रत्येक चुकीसाठी जर मूल कायम फटकेच खात राहिलं तर ते निगरगट्ट होण्याची भीती जास्त असते. किंवा आपल्यावर कुणाचा विश्वास नाही म्हटल्यानंतर त्यामुळे बाहेर भलतीकडेच आधार शोधायची शक्यता असते. आणि जगात त्याला चुकीच्या मार्गाला नेण्यासाठी अनेक लोक बसलेले असतात. एखाद्या कोवळ्या मुलाचं एखाद्या निबर गुन्हेगारात रूपांतर होण्यासाठी एवढं पुरेसं असतं. मग असं होऊ नये यासाठी काय करायचं तर ‘वर घालितो धपाटा आत आधाराचा हात’ असं असावं लागतं.

बरं या एका ओळीत सुद्धा निरीक्षण करण्यासारखी गोष्ट किती प्रमाणात असावी तर ‘वर घालितो धपाटा’. म्हणजे धपाटा हा नेहमी वरच्या बाजूला, अर्थात बाहेरच्या बाजूला असतो. रट्टे घालताना ते सगळ्यांना कळतील असे समोरच घातले जातात. रट्टे घालणारा हात दिसत असतो. त्यामुळे ज्याला रट्टे पडतात त्याला काय करू नये हे कळायला लागलेलं असतं. पण करू नये ते केल्यावर चारचौघात अपमान होतो. फटके बसतात. आयुष्याचा चेहरामोहरा बदलून जातो, आपण बसवलेली घडी मोडून जाते हे सगळं त्याला एका फटक्यात आणि एकावेळी कळतं. पण त्याला कळत हे नसतं की फटका देणारा माणूस दुसरा हात आधाराला धरून उभा आहे म्हणून आपण मोडून न जाता घडत जातो आहोत. त्याचं कारण असतं ‘आत आधाराचा हात’! आधाराचा हात कोणाला दाखवायचा नसतो. खुद्द त्या मुलालाही कळता कामा नये फक्त ते तुटून जाणार नाही. एवढी काळजी घेणारा आणि खात्री देणारा तो हात असावा लागतो.

म्हणून तो आत असतो. आतल्या गोष्टी अनेक असतात. बाहेर दाखवायच्या गोष्टी निराळ्या असतात. सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत. आणि आधारही बाहेरून देणेची गोष्ट नाहीच मुळी. तो आतूनच द्यावा लागतो. कोसळत्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याइतकं आधाराचा हात देणं सोपं नसतं. चुकलेल्या गोष्टींची समज ही वेळप्रसंगी कठोर शब्दात द्यावीच लागते. ती समज देताना त्या मुलाला वाईट वाटलं तर त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून गुरुना चलबिचल होऊन चालत नाही. ते मूल खरं बोलतंय की खोटं बोलतंय हे पुन्हा पुन्हा तपासून घ्यावं लागतं. कारण एक दुर्लक्ष त्या मुलाचं आयुष्य घडवायला किंवा सडवायला पुरेसं असतं. फार काय न्यायालय आपलं काम करीत असताना गुन्हेगारांना शिक्षा देतात ती शिक्षा, ते शासन किंवा न्यायालयाचा कोणताही निर्णय हा खुल्या न्यायालयात जाहीर करण्यात आला असं म्हटलं जातं.

याचं कारण असं असतं की न्यायालयाने निष्पक्षपणे सर्व लोकांच्या समोर हा निर्णय दिला. मग तो चांगला वाईट कोणताही असेल, पण तो समाजासमोर झाला हे महत्त्वाचं असतं. जो काही न्यायालयाचा निर्णय असेल तो सुद्धा सर्व लोकांना माहीत असणं हे अपेक्षित असतं. लपवून न ठेवणे अपेक्षित असतं. हेच तत्व लहान मुलांना शिस्त लावताना लागू करावं लागतं. काही वेळा जाहीरपणे त्यांना कठोर शब्दात सुनवावं लागतं. त्याचं कारण इतर सगळ्याच मुलांसमोर एक आदर्श निर्माण होणं गरजेचं असतं.

कसं वागावं आणि कसं वागू नये याचा वस्तुपाठ आवश्यक असतो. पण हा प्रकार मुलाच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारा असू नये याची काळजी घ्यावी लागते. ती काळजी घेण्यासाठी काय करायचं तर अत्यावश्यक तेवढाच भाग जो काही समोर बोलता येण्यासारखा असेल तो बोलणे आणि नंतर त्या मुलाला भक्कम आधार देण्यासाठी सपोर्ट सिस्टीम उभी करणे. आणि मुलाला कळून न देता त्याच्यावर लक्ष ठेवत राहणे. हे सगळं सगळं एका चांगल्या शिक्षकाला करत राहावं लागतं.

याच गाण्यात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या वाटांनी जातं. ज्याचं जसं नशीब असेल आणि जसे प्रयत्न असतील तसं यश त्याला लाभत जातं. आयुष्यातलं यशापयश चाखत असताना एकेका अनुभवाने शहाणा, समृद्ध होत असताना माणूस आपल्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी विसरून जात असतो. किंबहुना त्याला त्या आठवायला शांतपणा मिळतच नसतो. त्यावेळी सोसलेले चटके काही सगळ्यांना आठवणीत राहत नाहीत. जर एखाद्याला ते फार वाईट पद्धतीने सोसावे लागले असतील तर त्याची दाहकता शेवटपर्यंत टिकून राहते.

पण बहुतेकांच्या बाबतीत असं असतं की शाळेची शिस्त नावाच्या ज्या आव्यात ते भाजून निघालेले असतात त्या आव्याची आग आता ते विसरून गेलेले असतात. पण त्याच आगीत भाजून ही कच्ची मडकी पक्की झालेली असतात. आणि जगाचे अनुभव स्वत:मध्ये साठवून घ्यायला सज्ज झालेली असतात. ही सत्य परिस्थिती असते. प्रत्येकाचा एक वकूब असतो. एक क्षमता असते. गोल खोबणीत चौकोनी खुंट्या ठोकून बसवता येत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येक जण आपापली वाट निवडून निघून जातो. अशी शेकडो, हजारो मुलं एखाद्या शिक्षकाच्या हातून घडत असतात. ती त्यांच्या हुशारीप्रमाणे प्रसिद्धी पावतात. सचिन तेंडुलकरइतके काही रमाकांत आचरेकर प्रसिद्ध होत नसतात. प्रत्येक घटाला त्याची स्वत:ची प्रतिष्ठा लाभते. त्याला घडवणारा गुरु बऱ्याच वेळा अज्ञात राहतो पण याच अज्ञात हाताने त्याला घडवलेलं असतं हे विसरता येत नाही.

- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.