ढवळीतील शिक्षकाने नोकरीसाठी अनेकांना घातला 40 लाखांचा गंडा
रविवारी रात्री उशिरा फोंडा पोलिसात तक्रार नोंद
फोंडा : फोंडा तालुका सद्या ‘भुलभुलैया जॉब स्कॅम’ चा गड बनण्याकडे वाटचाल करीत असून ताज्या घडामोडीनुसार फोंडा पोलिसस्थानकाच्या हद्दीत ढवळी येथील शिक्षण संस्थेच्या एका शिक्षकाने बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प़ृत्याने त्या शिक्षण संस्थेलाच नव्हे तर विद्यार्थ्याचा आदर्श शिक्षक असलेल्या या शिक्षकाने शिक्षकी पेशालाही दाग लावण्याची लाजिरवाणे कृत्य केलेले आहे. फोंडा तालुक्यातील जॉब स्कॅमची ही सहावी तक्रार आहे. प्राप्त माहितीनुसार शिक्षण खात्यात एलडीसी, शिक्षक, मल्टि टास्क स्टाफ पदासाठी या शिक्षकाने बेरोजगारांकडून सुमारे 30-40 लाख रूपये उकळलेले आहेत. जॉब स्कॅमात मास्टरमाईंड म्हणून फोंडयातील दोन महिला अग्रेसर आहेत. त्यात आता ढवळी येथील या शिक्षकाची भर पडलेली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान या शिक्षकाने प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पाय धरल्याचे ऐकिवात आहे. मात्र मुख्यमंत्री यांनी कोणतीच दयामाया न दाखवता ‘गुन्हयाला माफी नाहीच’ असा पवित्रा घेत त्याला माघारी पाठविले आहे, अशी माहिती मिळाली आहे. तसेच फोंडा पोलिसांना याप्रकरणी कसून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. आमिषाला बळी पडलेल्यांनी पुढाकार घेत तक्रार नेंदविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. फोंडा तालुक्यातील जॉब स्कॅम प्रकरणातील सहावी तक्रार असून तिसरा मास्टरमाईंड आहे.
पहिल्या प्रकरणात म्हार्देळ पोलिसांनी पूजा नाईक व अजित सतरकर याला अटक केली होती. दुसऱ्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी सिंधुनगर कुर्टी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रकाश मुकुंद राणे (54) यांच्याविरोधात तक्रार नोंद झाली. तिसऱ्या प्रकरणात सागर सुरेश नाईक यांच्यासह सुनीता शशिकांत पावस्कर व दीपश्री सावंत गावस या तिघांचा समावेश असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. चौथ्या प्रकरणात आयआरबी कॉन्स्टेबलच्याविरोधात सावर्डे येथील सदानंद विर्नोडकर याने तक्रार दाखल केलेली आहे. पाचव्या प्रकरणात संदीप जगन्नाथ परब याने आपण दीपश्रीला सुमारे 44 बेरोजगारांना सरकारी नोकरीत रूजू करण्यासाठी रू. 3 कोटी 88 लाख दिल्याची तक्रार म्हार्दोळ पोलीस स्थानकात नोंद केली आहे.