For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे टार्गेट

06:58 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे टार्गेट
Advertisement

दुसरी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 9 विकेट्सची गरज : भारताचा दुसरा डाव 255 धावांत आटोपला 

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताचा संपूर्ण संघ 255 धावात गारद करत आघाडी 399 धावांपर्यंत रोखली. विजयासाठीच्या 399 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या डावाची जवळपास 5 च्या सरासरीने सुरुवात करत भारताला टेन्शन दिले. सलामीवीरांच्या अर्धशतकी सलामीमुळे इंग्लंडचे पारडे जड होणार असे वाटत होते पण अश्विनने पहिला धक्का देत थोडा दिलासा दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने 14 षटकांत 1 बाद 67 धावा केल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 332 धावा तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे. उभय संघासाठी आज चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे.

Advertisement

पहिल्या डावात भारताने यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 396 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांत आटोपला. बुमराहने 6 विकेट्स घेत संपूर्ण संघच गारद केला. यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 255 धावा केल्या. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला 399 धावा कराव्या लागणार आहेत.

गिलचा शतकी धमाका

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि 14 धावा करून तो बाद झाला. यानंतर पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वालही 17 धावा करुन तंबूत परतला. रोहित आणि यशस्वीला जेम्स अँडरसनने बाद केले. 30 धावांत 2 विकेट पडल्यानंतर गिल आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. या दोघांनी 81 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयसला (29 धावा) चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आपला डाव वाढवता आला नाही आणि त्याला रेहान अहमदने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस बाद झाला, पण गिलने शानदार शतक झळकावून भारताची स्थिती मजबूत केली. गिलने 147 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावा केल्या. गिलला अक्षर पटेलने 45 धावा करत चांगली साथ दिली. शतकानंतर गिल लगेचच बाद झाला. गिल बाद झाल्यानतर इतर तळाचे फलंदाजही झटपट बाद झाल्याने भारताचा दुसरा डाव 78.3 षटकांत 255 धावांवर संपुष्टात आला. अश्विनने 61 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक 4 तर रेहान अहमदने 3 विकेट घेतल्या. याशिवाय जेम्स अँडरसनला दोन, तर शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

साहेबांसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य

भारताने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर जॅक क्रॉली व बेन डकेट यांनी अर्धशतकी सलामी दिली. 11 व्या षटकांत अश्विनने डकेटला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. डकेटने 6 चौकारासह 28 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस क्रॉली व रेहान अहमद यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 14 षटकांत 1 गडी गमावत 67 धावा केल्या होत्या. क्रॉली 29 तर रेहान अहमद 9 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक - भारत प.डाव 396 व दुसरा डाव सर्वबाद 255 (यशस्वी जैस्वाल 17, रोहित शर्मा 13, शुभमन गिल 104, अक्षर पटेल 45, आर. अश्विन 29, हार्टले 77 धावांत 4 बळी, रेहान अहमद 3 तर अॅडरसन 2 बळी).

इंग्लंड प.डाव 253 व दुसरा डाव 14 षटकांत 1 बाद 67 (डकेट 28, क्रॉली ख्sाळत आहे 29, रेहान अहमद नाबाद 9, अश्विन एक बळी).

शुभमन गिलचे तिसरे कसोटी शतक

शुभमन गिल गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे, पण संघाला गरज असताना त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार शतकी खेळी साकारली. विशेष म्हणजे, गिलने 11 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कसोटीमध्ये शतक झळकावले आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने 104 धावा केल्या. गिलचे हे कसोटीतील तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. कसोटीतील पहिले शतक त्याने बांगलादेशविरुद्ध साजरे केले होते. याशिवाय, कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना गिलचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे, 2017 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतीय भूमीवर शतक केले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये चेतेश्व पुजाराने तिसऱ्या क्रमाकांवर खेळताना भारतीय भूमीवर शतकी खेळी केली होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहितच्या सर्वाधिक धावा

दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला पहिल्या डावात 14 तर दुसऱ्या डावात 13 धावा करता आल्या. रोहितला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी सामन्यादरम्यान त्याने एका विशेष विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे.  दुसऱ्या डावात 7 धावा करताच रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकत अनोखा विक्रम आपल्या नावे केला. रोहित आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराटला मागे टाकून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 36 सामन्यात 2235 धावा केल्या आहेत. तर रेहितने 29 सामन्यात 2245 धावा करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या जो रुटच्या नावावर आहे. रुटने आतापर्यंत 49 सामन्यांत एकूण 4023 धावा केल्या आहेत.

 जखमी जो रुटने इंग्लंडची वाढवली डोकेदुखी

रविवारी इंग्लिश संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज जो रुट जखमी झाला आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला चेंडू लागला, यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष्य ठेवून आहे. जर रुट तंदुरुस्त नसेल तर मात्र इंग्लंडसाठी ही चिंतेची बाब असणार आहे.

हिटमॅन क्लीन बोल्ड, अँडरसनचा चेंडू रोहितला समजलाच नाही

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. रोहित जेम्स अँडरसनच्या एका सुंदर चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. जेम्स अँडरसनने टाकलेला हा चेंड स्वप्नवत होता. हवेत स्विंग झालेला चेंडू रोहितला काही समजायच्या आत चेंडू स्टंपवर आदळला. दरम्यान, रोहित बाद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Advertisement

.