बिडीतील वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्याप्रकरणी सूरतमधून एका संशयिताला अटक
डिजिटल अरेस्ट करून दिला होता मन:स्ताप : दोन मोबाईल जप्त
बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला कंटाळून बिडी (ता. खानापूर) येथील एका वृद्ध दांपत्याने पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सूरत-गुजरात येथील एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी रात्री ही माहिती दिली आहे. चिराग जिवराजभाई लक्कड (वय 30) राहणार सूरत-गुजरात असे त्याचे नाव आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या युवकाची कसून चौकशी करून त्याला कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नंदगडलाही नेण्यात आले आहे. सायबर गुन्हेगारांच्या छळामुळे बिडी येथील डियागो संतान नजरत (वय 83) व त्यांची पत्नी फ्लाविया डियागो नजरत (वय 78) या वृद्ध दांपत्याने दि. 27 मार्च रोजी आपले जीवन संपविले होते. यासंबंधी नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.