For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जदार रेशनकार्डधारकांचा होणार सर्व्हे

10:45 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्जदार रेशनकार्डधारकांचा होणार सर्व्हे
Advertisement

आहार निरीक्षक घरोघरी, बोगस कार्डधारकांना दणका : नवीन रेशनसाठी 30 हजारहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज

Advertisement

बेळगाव : नवीन रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. दरम्यान आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अर्जदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे धनाढ्या असूनदेखील रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना दणका बसणार आहे. खोटी कागदपत्रे पुरवून अनेकांनी बीपीएल रेशन कार्डसाठी अर्ज केले आहेत. असे अर्ज अर्जदार आता अडचणीत येणार आहेत.

डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, आयकर भरणारे व्यक्ती, चारचाकी वाहने असलेले शासकीय नोकरदार आणि त्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तींनी अन्नभाग्य योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून देखील काही लाभार्थी रेशनचा उपभोग घेत असल्याचे समोर आले आहे. अशांवरही कारवाई केली जाणार आहे. रेशनकार्ड रद्द करून त्यांच्यावर दंड आकारला जाणार आहे. त्याबरोबर आता आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनदेखील बीपीएल रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या घरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. संबंधित जबाबदारी आहार निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

Advertisement

गतवर्षीपासून काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल कार्डची मागणी वाढली आहे. दरम्यान अनेकांनी खोट्या कागदपत्रांची पुर्तता करून बीपीएल कार्डसाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात 30 हजारहून अधिक लाभार्थ्यांनी नवीन रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर 27 हजारहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. असे एकूण 60 हजारहून अधिक लाभार्थी नवीन रेशन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या घरी येऊन कुटुंबाची पात्रता तपासली जाणार आहे. दरम्यान बोगस अर्जदार लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार

जिल्ह्यातून नवीन रेशनकार्डसाठी 30 हजारहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशा अर्जदारांच्या घरी जाऊन पात्रता तपासली जाणार आहे. संबंधित जबाबदारी आहार निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

- श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक)

Advertisement
Tags :

.