दोघा अट्टल गुन्हेगारांकडून पावणे अकरा लाखांचे दागिने जप्त
उद्यमबाग पोलिसांची कारवाई : एक चोरटा ठाण्यातील
प्रतिनिधी / बेळगाव
चोरी व चेनस्नॅचिंगप्रकरणी दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक करून उद्यमबाग पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे अकरा लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये ठाणे येथील एका युवकाचा समावेश असून त्याच्या साथीदाराला सहा महिन्यांपूर्वीच अटक झाली आहे.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी एच. शेखरप्पा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, उपनिरीक्षक किरण होनकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोन गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याजवळून 148 ग्रॅम सोने व 40 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
रफिक महम्मद शेख (वय 35) रा. ठाणे याला चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्याने दोन चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. लातूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाची परवानगी घेऊन 10 जुलै रोजी उद्यमबाग पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीत घेऊन चोरी प्रकरणातील दागिने जप्त केले आहेत.
तर शहापूर पोलिसांनी चेनस्नॅचिंग प्रकरणी अटक केलेल्या प्रज्ज्वल जयपाल खानजी (वय 28) रा. धामणे याला पोलीस कोठडीत घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रज्ज्वलने चेनस्नॅचिंगचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 12 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी एकूण 10 लाख 76 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर. पी. कदम, टी. बी. कुंचनूर, भरमण्णा करेगार, जगदीश हादिमनी, इरण्णा चवलगी, शिवकुमार कर्की, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींचा समावेश आहे.
चोरीसाठी ठाण्याहून बेळगावला
रफिक महम्मद शेख हा आपल्या एका साथीदारासमवेत चोरीसाठी ठाण्याहून बेळगावला येत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा एक साथीदार उद्यमबाग पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. तेव्हापासून पोलीस रफिकच्या मागावर होते. मात्र, तो लातूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यासंबंधीची माहिती मिळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पोलीस कोठडीत घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन चोऱ्यांची कबुली दिली.