For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट?

11:05 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट
Advertisement

सवलतीच्या दराने वस्तू उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार : अहवाल देण्याची ‘एमएसआयएल’ला सूचना

Advertisement

बेंगळूर : सैन्य आणि पोलीस कॅन्टीनच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही सुपर मार्केट सुरू करण्याचा विचार राज्य सरकारने चालविला आहे. यासंबंधी साधकबाधक मुद्द्यांविषयी महिनाभरात अहवाल सादर करण्याची सूचना अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी म्हैसूर सेल्स इंटरनॅशनल लि. (एमएसआयएल) ला दिली आहे. आहारधान्ये, एएमसीजी क्षेत्रात येणाऱ्या सर्व वस्तू सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारी सहभागातून चालविण्यात येणाऱ्या एमएसआयएलकडून सुपर मार्केट सुरू करण्याचा विचार सरकारने चालविला आहे. पहिल्या टप्प्यात बेंगळूरमध्ये 4 ते 5 ठिकाणी सुपर मार्केट उघडण्याचा विचार आहे. त्यानंतर इतर जिल्हा केंद्रांमध्ये अशा सुविधेचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

एखाद्या वेळेस कॅन्टीन सुरू केल्यास  6 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अनुकूल होणार आहे. उद्योग खात्याचे मुख्य सचिव सेल्वकुमार, एमएसआयएलचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार यांच्याशी उद्योगमंत्र्यांनी प्राथमिक फेरीतील चर्चा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्याचा विचार असलेल्या प्रस्तावित सुपर मार्केटमध्ये सबसिडी किंवा करात सवलत देता येईल का, याबाबत अर्थखात्याशी चर्चा करण्याची सूचना एम. बी. पाटील यांनी दिली आहे. शिवाय सुपर मार्केट सुरू करण्याबाबत साधकबाधक मुद्द्यांवर महिनाभरात अहवाल सादर करण्याची सूचना एमएसआयएला दिली आहे. अहवाल आल्यानंतर कॅन्टीन सुरू करण्यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सुपर मार्केटविषयी सरकारी कर्मचाऱ्यांत कुतूहल निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.