सुपरहिरो आहे 4 महिन्यांचे बाळ
वादळासोबत गेला होता उडून, एका झाडावर मिळाला सुखरुप
एका चार महिन्याच्या बाळासोबत घडलेली घटना जाणून घेतल्यावर लोक त्याची तुलना सुपरहिरोशी करत आहेत. याची कहाणी एका तीव्र वादळासोबत सुरू झाली, सुमारे एक आठवड्यापूर्वी जोरजोरात सायरन वाजू लागल्यावर लोकांना खराब हवामानामुळे उद्भवलेल्या धोक्याविषयी समजले, अमेरिकेच्या टेनेसीच्या क्लार्क्सविले येथे राहणारी 22 वर्षीय सिडनी मुरे या बाळाची आई आहे. वादळामुळे तिच्या घराचे (मोबाइल होम) छत उडून गेले, तेव्हा तिचा छोटा मुलगा लॉर्ड पाळण्यात झोपलेला होता, वादळाने त्याला देखील स्वत:सोबत उडवून नेले होते. वादळासंबंधी पूर्वी इशारा देण्यात आला नव्हता, सर्वकाही अचानक घडले, मी माझ्या एक वर्षीय मुलगा प्रिन्स्टनला घेऊन निवारा केंद्राच्या दिशेने धावले, तर 39 वर्षीय प्रियकर आणि या मुलांचा पिता अरामिस यंगब्लड लॉर्डला आणण्यासाठी गेला होता, परंतु लॉर्ड स्वत:च्या पाळण्यात नव्हता. सातत्याने येणारे वारे आणि वादळासोबत तो उडून गेला होता, असे तिने सांगितले. मूरेच्या घराच्या भिंती कोसळल्या होत्या. जोरदार वादळासोबत पाऊसही सुरू झाला होता. अशा स्थितीत मुरे स्वत:च्या घरातून एक वर्षीय मुलाला उचलून घेत सुरक्षितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होती.
दुसरीकडे प्रियकर अरामिस चार महिन्यांच्या लॉर्डला शोधत होता. लॉर्ड स्वत:च्या घरापासून सुमारे 30 फूट अंतरावर एका झाडावर असल्याचे आढळून आले. हे झाड वादळामुळे उन्मळून पडले होते.अरामिस पावसात भिजून लॉर्डला स्वत:सोबत आणत होते, त्यांचे कपडे फाटलेले होते. लॉर्डच्या चेहऱ्यावर जखमेची खुण होती. मदतीसाठी आम्हाला एक मैलापेक्षा अधिक प्रवास करावा लागला, त्यानंतरच बचावासाठी पथक आणि एक रुग्णवाहिका मिळू शकल्याचे मुरे यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, मग त्याच्या आईच्या ताब्यात त्याला देण्यात आले लॉर्ड एकदम तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या नॉर्थ टेनेसी शहरात 45 वर्षांपासून राहणारे क्लार्क्सविलेचे रहिवासी ब्रायंट यांनी तेथे मोठे नुकसान झाले, परंतु जीवितहानी झाली नाही हा एक चमत्कारच असल्याचे म्हटले आहे. सिडनी मुरेची बहिण कॅटलिनने या कुटुंबाच्या मदतीसाठी गोफंडमीवर पेज तयार केले आहे.