पाकिस्तानात सैन्यतळावर आत्मघाती हल्ला
23 सैनिकांचा मृत्यू : 6 दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या वाहनासह सैन्यतळात दाखल
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान सैन्यतळावर आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 23 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनुसार 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.
सैन्यतळात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न प्रथम उधळून लावण्यात आला. यानंतर दहशतवादी हे स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन सैन्यतळात दाखल झाले. येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे सैन्यतळाची इमारत कोसळली आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत सर्व 6 दहशतवाद्यांना ठार केले आहे.
तर पाकिस्तानी सैन्याने डेरा इस्माइल खान आणि कुलाची भागानजीक राबविलेल्या मोहिमेत 21 दहशतवादी मारले गेले आहेत. या मोहिमेदरम्यान 2 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मारले गेलेले दहशतवादी हे अनेक हल्ल्यांमध्ये सामील होते असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे.
यापूर्वी पाकिस्तानात 4 नोव्हेंबर रोजी मियांवाली वायुतळावर हल्ला झाला होता. आत्मघाती हल्लेखोरांनी वायुदलाच्या प्रशिक्षण तळात घुसखोरी केली होती. पाकिस्तानी वायुदलाने सर्व 9 दहशतवाद्यांना ठार केले होते. परंतु चकमकीदरमयन एक फ्यूल टँकर आणि 3 विमाने नष्ट झाली होती. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
तर 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तानात 2 ठिकाणी स्फोट झाले होते. यातील एक स्फोट बलुचिस्तानच्या मस्तुंग शहरात एका मशिदीनजीक झाला होता. या हल्ल्यात 54 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. तर दुसरा हल्ला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हंगू शहरातील मशिदीत झाला होता. हा देखील आत्मघाती हल्ला होता आणि यात एका पोलीस अधिकाऱ्यासमवेत 4 जणांचा मृत्यू झाला होता.