पुस्तकाची पाने फाटल्याने विद्यार्थ्यास मारहाण
कामुर्ली येथे खासगी शाळेतील प्रकार : दोन शिक्षिकांविऊद्ध पोलिसात तक्रार
म्हापसा : कामुर्ली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत सुरु असलेल्या खासगी हायस्कूलमध्ये महिला शिक्षिकेने पुस्तकाची दोन पाने फाटल्याप्रकरणी इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी पट्टीने तसेच पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची माहिती त्या मुलाने पालकांना दिली आहे. त्या मुलाच्या अंगावर व्रण आले आहेत. या घटनेची वाच्चता घरी जाऊन केल्यास यापेक्षा जास्त मारहाण करणार असल्याची धमकीही शिक्षिका व सहशिक्षिकेने त्या मुलाला दिली आहे, असे याबाबत मुलाच्या पालकांनी कोलवाळ पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलाच्या वडिलांनी घरी आल्यानंतर मुलाबाबत घडलेला हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. अभ्यास केला नाही म्हणून मारल्याचे शिक्षिकेने वडिलांना सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे वडिलांना पहावे लागले. त्या दोन्ही शिक्षिकांना निलंबित करावे, अशी मागणी त्या मुलाच्या पालकांनी केली आहे.
आपल्या नातवाला शिक्षकांनी बरीच मारहाण केल्याची माहिती त्या मुलाच्या आजीने दिली. शिक्षणासाठी लहान मुलांना असे मारावे काय? स्कूलच्या व्यवस्थापन मंडळाने घरी येऊन आमची भेट घेतली आणि त्या शिक्षिकेवर कारवाई करतो, तुम्ही पोलीस तक्रार करू नका असे सांगितले. मुलाला कोलवाळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. त्या शिक्षिकेने फोन करून आपण मारले म्हणून कुणालाही सांगू नका, तुम्हीच मारले असल्याचे सांगा, असे आम्हाला सांगितले. नंतर ती पुन्हा पुन्हा फोन करीत होती, मात्र आपण फोन घेतला नाही, असे वडिलांनी सांगितले. शिक्षिका सुजल गावडे व कनिशा गडेकर या दोन्ही शिक्षिकांविरुद्ध मुलाचे पालक यशवंत चोडणकर यांनी पोलीस तक्रार नोंदविली असून या संदर्भातील छायाचित्रेही पोलिसांना सादर करण्यात आली आहेत. कोलवाळ पोलीस अधिक तपास करीत आहे.
दोन्ही शिक्षिकांचे निलंबन अटळ
याप्रकरणाची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली असून शाळेच्या व्यवस्थापनाचे चेअरमन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका या दोघांनाही आज बुधवारी सकाळी शिक्षण संचालनालयात हजर राहण्यास बजावले आहे. दोन्ही शिक्षिकांचे निलंबन अटळ आहे.