जिद्दीने झपाटलेला दिव्यांग बुद्धिबळपटू : मनोहर गावडे
पर्पल फेस्टमध्ये चमकदार कामिगिरी : बुद्धिबळमध्ये यशाची निरंतर दौड
नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा
शारीरिक कमतरता असूनही काही व्यक्ती जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर त्यावर मात कऊन जीवनात यशस्वी होत असतात. मनोहर बाबुराव गावडे हा असाच जिद्दीने झपाटलेले दिव्यांग बुद्धिबळपटू आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेत मनोहर गावडेने दिव्यांग गटात अजिंक्यपद पटकावले. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तो सहभागी होत असून अनेक ठिकाणी त्याला पारितोषिके प्राप्त झाली आहेत. मनोहरमध्ये काही शारीरिक उणिवा आहेत, पण दुर्दम्य आशावादापुढे त्याने त्यावर मात केली आहे.
दिव्यांग व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ लाभावे या उद्देशाने पर्पल फेस्टमध्ये व्हिलचेअर क्रिकेट, बास्केटबॉल, ब्लाईंड क्रिकेट अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा बुद्धिबळ स्पर्धा फोंडा येथील मिनीनो एक्झिक्युटिव्ह सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेत मनोहरने अपराजित राहून सात फेऱ्यातून सात गुण मिळवून अजिंक्यपद प्राप्त केले. यासाठी अजिंक्य चेस अकादमी कुर्टीतर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. केपे येथे यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलेल्या स्व. चंद्रकांत नाईक स्मृती अखिल भारतीय फिडे रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत त्याला उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. गत सालीही तो या स्पर्धेत खेळला होता. 2022 साली रोटरी क्लब पर्वरी यांनी आयोजित केलेल्या अखिल गोवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत, 2023 साली पणजी येथे झालेल्या स्व. लेफ्टनंट कमांडर गोपाळ सुखठणकर स्मृती खुल्या रॅपिड फिडे मानांकन स्पर्धेत, मडगाव येथील स्व. पूर्णलता ओमप्रकाश अग्रवाल अखिल गोवा रॅपिड मानांकन बुद्धिबळ तसेच वास्को येथे झालेल्या सुमती व व्यंकटेश शानबाग स्मृती अखिल भारतीय रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सहभाग दर्शविला.
कुर्टी फोंडा येथील गणेश एकता मंदिरात फोंडा फ्रेंडस् सर्कलतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत तो विजेता ठरला होता. मिशन कुर्टी-चेस इन एव्हरी हाऊस अंतर्गत जनशक्ती वेलफेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. केळबाय प्रभागासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत चौथे स्थान तर श्रीकृष्ण मंदिर कुर्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद प्राप्त केले होते. मनोहरने इयत्ता दुसरीत असताना बुद्धिबळ खेळायला प्रारंभ केला. कुर्टी येथील कृष्णा अंता गावडे हे स्थानिक मुलांना बुद्धिबळ खेळायला शिकवित होते. मनोहरने त्यांच्याकडून हा खेळ शिकून घेतला. कुर्टी येथील दादा वैद्य हायस्कूलमध्ये त्याने नववी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थानमधून तो दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला. सध्या तो बेतोडा येथील युनायटेड ब्रिव्हरीज येथे कामाला आहे.
मुलांना देतो बुद्धिबळचे प्रशिक्षण
मनोहर आपली नोकरी सांभाळून अनेक बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेत आहे. यासाठी तो नियमित सराव करतो. त्याचबरोबर गावातील मुलांना बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षणही देत आहे. ‘मिशन कुर्टी - चेस इन एव्हरी हाऊस’ हा एक अनोखा प्रकल्प गावात राबविण्यात आला. याद्वारे प्रत्येक घरातील लोकांना बुद्धिबळ खेळ शिकवण्यात आला. या प्रकल्पात त्याने योगदान दिले आहे.
लोककलेतही पारंगत
कुर्टी गावात होणाऱ्या पारंपारिक जागोर कार्यक्रमात 38 वर्षीय मनोहर विविध भूमिका साकारीत आहे. शिमगोत्सवातही सहभागी होऊन तो ढोल व ताशा उत्कृष्टपणे वाजवितो. राज्य पातळीवरील शिमगोत्सव मिरवणुकीत सरस्वती कला मंडळतर्फे घोडेमोडणी पथकात सहभागी होत असून यावर्षी त्यांना 7 ठिकाणी प्रथम तर 8 ठिकाणी द्वितीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
सरकारी नोकरीच्या प्रयत्नात
आपल्यात शारीरिक कमतरता असली तरी जिद्द बाळगून मनात ठरविले तर आपण काहीही करू शकतो. दिव्यांगानी कोणत्याही कामात मागे राहू नये. सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मनोहर सांगतो. सध्या तो खासगी नोकरी करीत असला तरीही सरकारी काम मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांने अर्जही केले आहेत. सरकारी नोकरी मिळाली तर त्याचे पुढील आयुष्य सुखकर होऊ शकेल.