भारतीय युवा संघाच्या डावाला दमदार प्रारंभ
यू-19 दुसरी कसोटी, पहिला दिवस : भारताच्या चार फलंदाजांची अर्धशतके
वृत्तसंस्था / चेन्नई
सोमवारपासून येथे सुरु झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या युवा कसोटी सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने पहिल्या डावात दिवसअखेर 5 बाद 316 धावा जमविल्या. भारतीय युवा संघातील 4 फलंदाजांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या होकेस्ट्राने वैभव सूर्यवंशीला 3 धावांवर बाद केले. त्यानंतर मल्होत्रा आणि नित्या पंड्या यांनी दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या रामकुमारने मल्होत्राचा 10 धावांवर त्रिफळा उडविला.
नित्या पंड्या आणि के.पी. कार्तिकेय या जोडीने संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केली. नित्या पंड्याने 135 चेंडूत 12 चौकारांसह 94 धावा जमविल्या. होकेस्ट्राने त्याला झेलबाद केले. भारताने आणखी एक गडी पाठोपाठ गमविला. होवेने कार्तिकेयला झेलबाद केले. त्याने 99 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. भारताची यावेळी स्थिती 4 बाद 185 अशी होती.
कर्णधार सोहम पटवर्धन आणि निखिल कुमार यांनी पाचव्या गड्यासाठी 105 धावांची शतकी भागिदारी केल्याने भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. पॅटर्सनने निखिल कुमारला झेलबाद केले. त्याने 93 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावा जमविल्या. पटवर्धन 6 चौकारांसह 61 तर हर्वंश पांगलिया 7 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे होकेस्ट्राने 29 धावांत 2 तर रामकुमार, होवे आणि पॅटर्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उभय संघातील सुरु असलेल्या या मालिकेत भारतीय युवा संघाने पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियावर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक: भारत युवा संघ- प. डाव 90 षटकात 5 बाद 316 (नित्या पंड्या 94, कार्तिकेय 71, पटवर्धन खेळत आहे 61, निखिल कुमार 61, वैभव सूर्यवंशी 3, अवांतर 9, होकेस्ट्रा 2-29, होवे, रामकुमार, पॅटर्सन प्रत्येकी 1 बळी)