For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकसित राष्ट्र निर्मितीसाठी जोरदार पुनरागमन आवश्यक; पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र

06:55 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
विकसित राष्ट्र निर्मितीसाठी जोरदार पुनरागमन आवश्यक  पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र
Advertisement

राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील पाच वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी या काळात खूप काम करण्याची गरज आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी येत्या सार्वत्रिक निवडणुकीत शत-प्रतिशत यश मिळवत सत्तेत टिकून राहणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देश मजबूत करण्याचे आपले ध्येय आहे. आम्हाला परिवाराची काळजी वाटू लागली असती तर आज देशातील करोडो गरीब जनतेसाठी घरे बांधून झाली नसती. तिसऱ्या टर्ममध्ये आता देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवायचे असून देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे आश्वासन देण्याचे धाडस विरोधी पक्षांना दाखवता येत नाही, असा हल्लाबोलही पंतप्रधानांनी केला.

Advertisement

दिल्लीतील भारत मंडपम येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात साध्य केलेली उद्दिष्टे आणि येत्या पाच वर्षात ‘विकसित भारत’चा संकल्प साध्य करण्यासाठी घ्यायची मोठी झेप याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक भारतीयाचे जीवन बदलण्यासाठी आणि देशहिताच्या बऱ्याच गोष्टी साध्य करण्यासाठी भाजपकडून अद्याप अनेक निर्णय घेणे बाकी आहे, परंतु यासाठी पहिली अट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकारमध्ये जोरदार पुनरागमन होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी विशेषत्वाने स्पष्ट केले.

विरोधकांना कानपिचक्या

सुमारे 65 मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने आमचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही, असा आरोप त्यांनी केला. विरोधक सध्या देशाला कमकुवत करण्यात व्यस्त आहेत. देशाला पुढे नेण्याची दृष्टी त्यांच्याकडे नाही. काँग्रेसमधील काही लोक आपल्यावर वैयक्तिक हल्ले करण्याच्या बाजूने नाहीत. मात्र, काही नेत्यांना खोटे आरोप करण्याची सवयच झालेली आहे, असे ते म्हणाले.

शतकानुशतके प्रलंबित कामे केली पूर्ण

रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पंतप्रधानांनी गौरवाने उल्लेख केला. सर्व देशवासियांना अनेक शतके आणि वर्षांपासून रामलल्लांची प्रतीक्षा होती. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज राम मंदिराची उभारणी शक्मय झाली आहे. सात दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाले. चार दशकांनंतर आपल्याला वन रँक वन पेन्शनची भेट मिळाली आहे. तीन दशकांनंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळाले आहे. अनेक दशकांपासून संसदेच्या नव्या इमारतीची गरज ओळखून ती आम्ही पूर्ण केली. कर्तारपूर साहिबचा रस्ता खुला करणे ही अशी कामेही सरकारने पूर्ण केली आहेत. पण विरोधी पक्षात एवढे मोठे काम करण्याची हिंमत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

आगामी मास्टर प्लॅनही तयार

भाजपकडे विकसित राष्ट्राचा मास्टर प्लॅन तयार आहे. केंद्र सरकार आगामी काळात ऑलिम्पिकचे आयोजन, हरित ऊर्जा आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाला खाद्यतेल आणि कडधान्यांमध्ये स्वावलंबी बनविण्याची योजना आखत आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी गावागावात नवीन तलाव बांधले जात आहेत. सोलर रूफटॉप मोहिमेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यास मदत होईल. ज्यांचा आजपर्यंत कोणी विचारही केला नव्हता, त्यांच्यासाठी आपल्या सरकारने अनेक योजना आणल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले सरकार केवळ देशातच नाही तर जगाचे आकर्षणही ठरत आहे. पाश्चात्य आणि अरब देशांमध्ये भारताची ताकद वाढली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये परदेशात जाण्याची निमंत्रणपत्रे अजूनही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून परदेशातील सरकारांना केंद्रात भाजपच्या पुनरागमनावर विश्वास असल्याचे दिसून येत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

विकासाचे स्वप्न

भारताचा विकास करायचा हे आपल्या सर्वांचे स्वप्न आणि संकल्पही आहे. पुढील पाच वर्षांत भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करायचे आहे. आपल्याला विकसित भारताकडे मोठी झेप घ्यायची आहे. त्यासाठी प्रत्येकाला मोठी भूमिका बजावावी लागेल, असे पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना सांगितले. येत्या निवडणुकीत एनडीएला 400 चा आणि भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागणार आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढील 100 दिवस नव्या जोशात, नव्या उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

25 कोटी लोक गरिबीतून बाहेर

25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे ही सामान्य कामगिरी नाही, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले. आम्ही देशाला घोटाळे आणि दहशतवादी हल्ल्यांपासून मुक्त करतानाच गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेली व्यक्ती आहे. मला माझ्या घराची काळजी असती तर आज करोडो गरिबांसाठी घरे बांधली गेली नसती. देशातील तऊण, महिला आणि गरिबांची स्वप्ने आणि संकल्प हा ‘मोदींचा संकल्प’ आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत, असेही पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले.

तरुणांवर लक्ष केंद्रित करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तऊणांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आज 18 फेब्रुवारी असून या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18व्या लोकसभेसाठी निवडून येणार आहेत. पुढील 100 दिवस आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण सर्वांचा विश्वास संपादन केला पाहिजे. या दोन दिवसांत झालेल्या चर्चा आणि विचारमंथन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला संकल्प अधिक दृढ करणाऱ्या गोष्टी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

Advertisement
Tags :

.