विशाळगडावर कठोर धोरण राबवावे
कोल्हापूर :
विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला असला तरी गडावर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर धोरण राबवण्याची मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे, गडावर जाणारे खरेच पर्यटक आहेत की अन्य काही विपरीत हेतूने जात आहेत, याची शहानिशा कशी केली जाणार आहे का? गडावर जाणाऱ्या पर्यटकांची पूर्ण नोंद ठेवण्यासाठी काय उपाययोजना केली आहे ? असे प्रश्न उपस्थित करुन सर्वांचे आधारकार्ड पाहूनच गडावर जाण्यासाठी अनुमती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सर्व पर्यटक गडावरून सायंकाळी 5 वाजल्यानंतर खाली आले आहेत का हे तपासण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, प्रशासनाकडे गोपनीय विभागाचे काही अहवाल असल्यास, त्यानुसार कोणती विपरीत घटना घडू शकते याची माहिती जाहीर करण्यात यावी, गडावर आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ बसवून पर्यटकांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जावे, सर्व अवैध अतिक्रमणे काढण्या संदर्भातील कारवाईचा अहवाल जाहीर करण्यात यावा, गडावर शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर व प्रभावी धोरण अवलंबावे अशा मागण्या केल्या आहेत.
यावेळी सुनील घनवट, बाबासाहेब भोपळे, संभाजी भोकरे, किशोर घाटगे, निरंजन शिंदे, मनोहर सोरप, शिवानंद स्वामी, संदीप सासने, योगेश केरकर, गणेश मिरजे, रामभाऊ मेथे, कैलाश दिक्षित, अनिल दिंडे उपस्थित होते.