‘सीपीआर’मध्ये एका वर्षात 4500 डायलेसिस
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) औषधवैद्यकशास्त्र विभागातील तीनही युनिटमध्ये गत एका वर्षात तब्बल 4 हजार 597 रूग्णांवर यशस्वीरीत्या डायलेसिस करण्यात आले आहेत. रोज 10 ते 15 रूग्णावर डायलेसिस केले जात आहे. डायलेसिसचा विभाग 24 तास सेवेत असुन अनेक गंभीर रूग्णांना जीवदान मिळाले आहे.
सीपीआरमध्ये उपचार वेळेवर मिळत नाहीत, डॉक्टर दुर्लक्ष करतात अशा तक्रारींचा सुर असतो. काहीवेळा डॉक्टरांकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोपही केले जातात. तशा घटनाही घडल्या असतील. मात्र, अनेक गंभीर रूग्णावर उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे कामही याच दवाखान्यात झाले आहे. यातीलच रूग्णाच्या किडण्या निकामी झाल्यानंतर गरजूंना कराव्या लागणाऱ्या डायलेसिसचे उपचार सीपीआरमध्ये मोफत होत आहेत. याचे प्रमाणही वाढत आहे. आता तर हा विभाग अद्ययावत तंत्रज्ञाने विकसित होत आहे. त्यामुळे उपचारामध्ये आणखी सुलभता होणार आहे.
येथे तीन युनिटमध्ये 11 बेडची व्यवस्था आहे. सोबतच 30 आयसीयू आहेत. नुतनीकरणानंतर 12 बेडची व्यवस्था केली जाणार आहे.
आयसीयूची संख्याही वाढणार आहे. यामध्ये प्लास्मा थेरपी व हिमोडायलेसिस अस दोन प्रकार उपलब्ध आहेत. एचआयव्ही, कावीळ ब व क रूग्णांवर केवळ सीपीआरमध्येच डायलेसिस केले जातात. उपचार करत असताना एखाद्या पॉझिटिव्ह रूग्णाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ऱ्ऊ या नवीन प्रणालीद्वारे रक्ताची तपासणी केली जाते.
- पुरूषांचे प्रमाण अधिक
किडणीच्या विविध आजारामध्ये महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. पुरूषांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक असते. मिळालेल्या आकडेवारीनूसार सीपीआरमध्ये वर्षभरात 1503 व पुरूषांचे 3092 किडणी विकारावर उपचार झाले आहेत. त्यामुळे पुरूषांचे प्रमाण दुप्पट आहे.
- किडणी निकामी होण्याची कारणे :
उच्च रक्तदाब, किडणी स्टोन, साप चावणे, पेन किलर औषधांचे सेवन, कॅन्सरवरील थेरपी सहन होणे, अति मद्यप्राशन, निमोनिया, रक्तातील काविळ, कोविड मधील जंतूसंसर्ग, गॅस्ट्रो, क्षयरोग, ग्रीमेझोन विष प्राशन
- 2024 मध्ये डायलेसिस झालेली रुग्णसंख्या :
महिना स्त्री पुरूष एकूण
जानेवारी 122 364 486
फेब्रुवारी 144 333 477
मार्च 174 271 444
एप्रिल 155 335 490
मे 168 306 474
जून 137 261 388
जुलै 116 275 391
ऑगस्ट 108 259 367
सप्टेंबर 91 212 303
ऑक्टोबर 120 252 342
नोव्हेंबर 75 138 210
डिसेंबर 98 126 224
एकूण 1505 3092 4597
- अशी घ्या किडणीची काळजी :
- योग्य आहाराचा समावेश
- रक्तदाब व मधुमेह कंट्रोल करणे
- डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेन किलरची औषधे घेणे
- मुतखडा असेल तर वेळीच काढणे
- रक्ताची तपासणी करून घेणे
- पाणी भरपूर पिणे, मद्यप्राशन टाळणे
- लवकरच सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल : किडणी प्रत्यारोपनाची होणार व्यवस्था
शेंडा पार्क येथे होणाऱ्या वैद्यकीय नगरीमध्ये 1100 बेडचे सुसज्य हॉस्पिटल होणार आहे. यामध्ये किडणी विकारावरील सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रस्तावित आहे. यामध्ये किडणी ट्रान्सप्लांटसह किडणीचे सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. यासाठी पुणे, मुंबईला जावे लागणार नाही. त्यामुळे लाखोंचा खर्च वाचणार आहे.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- अध्ययावत तंत्रज्ञ विकसित
सीपीआरमध्ये अध्ययावत तंत्रज्ञ विकसित होत आहे. वर्षभरात किडणीशी निगडीत अनेक गंभीर रूग्णांवर मोफत उपचार केले आहेत. नुतनीकरणानंतर आयसीयूसह डायलेसिस बेडची संख्या वाढणार आहे. त्यामुळे उपचारामध्ये सुलभता निर्माण होणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
डॉ. अनिता परितेकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, सीपीआर